0

तुपकर म्हणाले, मोदींचा पराभव हेच संघटनचे प्रमुख ध्येय आहे.


मुंबई- हातकणंगलेसह इतर ३ लोकसभा मतदारसंघांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीने योग्य तो प्रतिसाद न दिल्यास स्वबळावर लढू, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी राज्यात चौथी आघाडी उभारणार असल्याच्या २-३ दिवसांपासून चर्चा आहेत. मात्र, 'आम्ही राज्यात चौथी आघाडी उभारणार असल्याच्या बातमीत तथ्य नाही'असेही तुपकरांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले. तुपकर म्हणाले, मोदींचा पराभव हेच संघटनचे प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरवले. मात्र, त्यांच्याकडून सन्मानजनक जागावाटप होत नाही. तसेच संघटनेला फरपटत जाणेही मान्य नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याचा संघटनेत विचार आहे. राज्यात चौथी आघाडी करण्याचा संघटनेत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. त्याबाबत नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. काँग्रेससोबतची चर्चेची दारे अजूनही बंद झालेली नाहीत. त्यामुळे राजू शेट्टी हे चौथी आघाडी बांधणार, यात काहीही तथ्य नसल्याचेही तुपकरांनी स्पष्ट केले.

एकीकडे राजू शेट्टी तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची चर्चा काही केल्या पुढे जात नाही. त्यामुळे राज्यातील दहा पुरोगामी पक्षांची मोट बांधून महाआघाडी करण्याचे काँग्रसे-राष्ट्रवादीचे स्वप्न अस्तित्वात येण्यापूर्वी भंगते की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे.

२०१४ मध्ये तीन, आता एकच का? 
२०१४ च्या लोकसभेला भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माढा, हातकणंगले आणि कोल्हापूर या लोकसभेच्या तीन जागा सोडल्या होत्या. मग, २०१९ ला आम्ही एकाच जागेवर कसे काय समाधान मानू, असा संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा सवाल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले हा राजु शेट्टींचा मतदारसंघ आहे. तो वगळून वर्धा, बुलडाणा आणि माढा हे तीन लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हवे आहेत.

अद्याप काही आश्वासन नाही, पण एकाच जागेवर बोळवण हे खेदजनक 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किती जागा सोडायच्या याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीही आश्वासन दिलेले नाही. मात्र, हातकणंगले या एकाच जागेवर संघटनेची बोळवण केली जाईल, हे आम्हाला प्रसिद्धी माध्यमातूनच समजते आणि ते अत्यंत खेदजनक आहे. - रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

बुलडाणा, वर्ध्यात आघाडीचे उमेदवार 
एकीकडे बुलडाणा आणि वर्ध्याच्या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीने या दोन्ही जागा आधीच वाटून घेतल्या आहेत. राष्ट्रवादीने बुलडाण्यातून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना, तर काँग्रेसने वर्ध्यातून चारुलता टोकस यांना उमेदवारी देऊ केलेली आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष नाराज आहे. वर्धामधून त्यांना सुबोध मोहिते आणि बुलडाणामधून प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना रिंगणात उतरवायचे आहे. 
Give us four seats otherwise we fight independently: Swabhimani party warns Congress- NCP

Post a comment

 
Top