0
प्रशिक्षक उदय देशपांडे यांचा विदारक अनुभव

मुंबई- मल्लखांब ही पारंपरिक कला किंवा सध्याचा क्रीडाप्रकार. मूळचा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणाऱ्यांना या खेळाचे महत्त्व कधीच कळले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या खेळाला कधीच मदतीचा हात दिला नाही. उदय देशपांडे नामक एका व्यक्तीने मात्र आपलं आयुष्यच या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेचलं. तब्बल ५२ देशांमध्ये दोरीवरचा आणि खांबावरचा मल्लखांब घेऊन ते त्या देशांमध्ये गेले. कालपरवा ते मलेशियातील मल्लखांब प्रचार दौरा आटोपून आले. मुस्लिम देशांमध्ये या खेळाला कसे स्वीकारले? विशेषत: बुरख्यात वावरणाऱ्या महिलांना या देशांनी ‘ग्रीन सिग्नल’ कसा दिला याबाबत कुतूहल होते.


अमेरिकेपासून युरोप देश व आशिया खंडातील सिंगापूरपर्यंत मल्लखांब त्यांनी पोहोचवला. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन ते परत आले. त्यांच्या बोलण्यातून एक कटू सत्यही जाणवले. मल्लखांब हा खेळ बऱ्याच देशांनी स्वीकारला आहे, मात्र भारतीय संस्कृतीच्या मराठमोळ्या संस्कृतीच्या खाणाखुणा जोपासणाऱ्या या खेळावरची आपल्या संस्कृतीची छाप परदेशी लोकांना पुसून टाकायची आहे.

त्यांना सूर्यनमस्कारमध्ये सूर्याला नमस्कार न करताच पुढील प्रशिक्षण सुरू ठेवायचे. सूर्यदेवतेचा नामोच्चार त्यांना नको आहे. देशपांडे म्हणत होते, ‘जर्मनीत तर मी गेली २० वर्षे प्रशिक्षण देण्यासाठी जात आहे. त्यासाठी मी जर्मन भाषा शिकून घेतली. मात्र आता त्यांनाही मल्लखांबाची सुरुवात करताना एकसाथ नमस्ते म्हणायचे नाही. मल्लखांबावरच्या पकडी व आसनांची हिंदू देवदेवतांची नावे उच्चारायची नाहीत. कवायत विसर्जन म्हणायचे नाही. ‘जयहिंद’चा नारा द्यायचा नाही. आपली कला, कौशल्य, खेळ शिकून घेऊन त्यामध्ये त्यांना मोडतोड करायची आहे. आपण ज्युदो, कराटेत जपानी शब्द वापरताे, मात्र ते आपले शब्द वापरत नाही.

नियमांची मोडतोड सुरू
खेळात आपल्या संस्कृती व प्रार्थना, समारोप हे आपल्या परंपरेप्रमाणेच व्हायला हवेत असा आग्रह धरला. मात्र जगातील मंडळींना या खेळाचे भविष्य दिसत आहे. त्यामुळे भारताला किंवा महाराष्ट्राला श्रेय मिळू न देता या खेळात स्वत:चे काहीतरी मिसळून किंवा नियमांची तोडफोड करून त्यांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे आहे. या खेळाचे ‘पेटंट’ त्यांनी स्वत:च्या नावे नोंदवल्यास आश्चर्य वाटणार नाही.

जगातील ५२ देशांचा आला अनुभव
देशपांडेंना ५२ देशांमध्ये असे अनेक भलेबुरे अनुभव आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके नखशिखांत कपडे परिधान करूनच करा, ही अट यजमान देशाची होती. याउलट देशपांडेंना मलेशियात आलेला अनुभव काहीसा सुखद होता. तेथे चिनी, मलय यांच्या जोडीने मुस्लिम लोक मल्लखांब शिकण्यासाठी आले होते. महिलांनी अंगभर कपडे परिधान करूनच दोरीचा मल्लखांब शिकला. या खेळावर मलेशियात लोक एवढे फिदा झाले आहेत की पुढील वर्षी होणाऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेत त्यांना त्यांचा संघ उतरवायचा आहे. त्यासाठी ते तयारी करत आहेत. Mallakhamb is popular all over the world ... but efforts to eradicate Indian identity

Post a Comment

 
Top