0
उंब्रज :

राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बळकट होणे आवश्यक आहे. पक्षामध्ये वैयक्‍तिक स्वार्थासाठी कोण आडवा येणार असेल, काँग्रेस पक्षाला अपशकुन देणार असेल तर त्याला खड्यासारखे बाजूला काढा. पक्ष म्हणजे धर्मशाळा नाही. काँग्रेस पक्षाचा फायदा घ्यायचा व दुसरीकडे जायचे ही वर्तणूक चालणार नाही. ज्याला भाजपमध्ये जायचे आहे त्याला मार्ग मोकळा आहे, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.

उंब्रज (ता. कराड) येथे कराड उत्तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.आनंदराव पाटील होते. अजित पाटील, कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव, जेष्ठ नेते मधुकर जाधव, मारूतराव जाधव, सुनिल पाटील, जयंत जाधव, सौ. धनश्री महाडीक, दुर्गेश मोहिते, वसंतराव पाटील आदींची होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यानी कराड उत्तर मधील खदखद व्यक्‍त केली असून, कोणी मेळावे घेतले, कोणी पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांना पक्षाची शिस्त माहित नाही. चार पैसे आले की आपण  लोकांचा स्वाभिमान विकत घेवू शकतो, असे वाटत आहे. मात्र, यापुढे असे चालणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात आघाडीचा निर्णय झाला असून, तो सर्वांना मान्य करावा लागेल.
आ.आनंदराव पाटील म्हणाले, आजचा मेळावा निष्ठावान कार्यकर्त्यांचा आहे. यापूर्वी काहीनी पत्रकार परिषद घेवून बेछुट आरोप करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांनी सांगितले तर मी पुन्हा उभा राहणार आहे अशी घोषणा काहीनी केली. मात्र त्यांना मते देणार कोण ? तसेच  अनेकांनी बाबांच्या आर्शिवादाने अनेक पदे जिल्हा परीषद, पंचायत समिती मध्ये भोगली मात्र पदे भोगाणारे आता गेले कोठे ? असा प्रश्‍न उपस्थित केला. अजितराव पाटील यांनी पक्ष बदलणार्‍या माणसापासून सावध राहिले पाहिजे, असा सूचक इशारा दिला.

तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव म्हणाले, कराड उत्‍तरमध्ये दिडशे कोटींचा निधी हा आ.आनंदराव पाटील यांच्या पत्रावरून मिळाला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय इतर कोणी घेवू नये. यावेळी जयंत जाधव, धनश्री महाडीक, निसार मुल्‍ला, जितेंद्र भोसले, जयसिंगराव जाधव, डॉ.शंकरराव पवार, सुरेश घोलप, कॅप्टन इंद्रजित जाधव यांनी मनोगत व्यक्‍त केले.प्रास्ताविक जयंत जाधव यांनी केले. आभार दुर्गेश मोहिते यांनी मानले. प्रारंभी हेमंत जाधव यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यास उंब्रजसह परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

 
Top