0
कोल्हापूर :

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी काँग्रेसचे शारंगधर देशमुख विजयी झाले. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे राजाराम गायकवाड यांचा पराभव केला. देशमुख यांना नऊ, तर गायकवाड यांना सात मते मिळाली. शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी काँग्रेसला मतदान केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत निवडणूक झाली.


स्थायी समितीत काँग्रेसचे सहा व राष्ट्रवादीचे दोन असे आठ सदस्य आहेत. विरोधी भाजपचे तीन व ताराराणी आघाडीचे चार असे सात सदस्य आहेत. शिवसेनेचा एक सदस्य समितीत आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी देशमुख व गायकवाड यांचे अर्ज दाखल होते. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी पीठासन अधिकारी मित्तल यांना सभापतिपदासाठी दोन अर्ज दाखल असल्याची माहिती दिली. मित्तल यांनी छाननी करून अर्ज वैध असल्याचे जाहीर करून माघारीसाठी 15 मिनिटे वेळ दिला. कोणीही अर्ज मागे घेतला नाही.

 त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. देशमुख यांना 9, तर गायकवाड यांना 7 मते पडली. सर्वाधिक मते मिळाल्याने देशमुख यांची सभापतिपदी निवड झाल्याचे मित्तल यांनी जाहीर केले. देशमुख हे प्रभाग क्र. 71 रंकाळा तलाव या मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसचे गटनेता म्हणून ते कार्यरत असून यापूर्वी त्यांनी 2012-13 मध्ये स्थायी समिती सभापती पद भूषविले आहे. निवडीनंतर देशमुख यांनी तत्काळ कार्यालय प्रवेश केला. आमदार सुमन पाटील यांच्या हस्ते फीत कापून व सौ. प्रतिमा सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यालय प्रवेश केला. महापौर सरिता मोरे व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणुकीत कोणतीही रिस्क नको म्हणून स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य, प्रभाग समिती सदस्यांना सहलीवर पाठविले होते. गेले काही दिवस गोव्यात असलेल्या नगरसेवकांना सोमवारी रात्री बेळगावात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ते कोल्हापुरात आले. आ. सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयातून मतदानावेळी त्यांना महापालिकेत आणले. यावेळी सभापतिपदाच्या उमेदवारांच्यासोबत ऋतुराज पाटील होते. स्थायी सभापतिपदाची निवडणूक होईपर्यंत ते महापालिकेत थांबून होते. दरम्यान, निवडीनंतर देशमुख यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. साने गुरुजी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. 

Post a comment

 
Top