0
न्‍यूयॉर्क :

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर ते १३ जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. त्‍यांच्‍यावर मंगळवारी न्यूयॉर्क येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


गतवर्षी जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सॉफ्ट टिश्यूच्या कॅन्सरसंबंधी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी जेटली यांना दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी रेल्वे आणि कोळसा खात्याचे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. ते हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीस हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयूष गोयल यांच्याकडे हंगामी अर्थ आणि कार्पोरेट मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार दिल्याचे राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही दोन्ही मंत्रालये जेटलींकडे होती. गेल्यावर्षी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जेटलींची जबाबदारी सांभाळली होती.

Post a Comment

 
Top