महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार केला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार केला आहे. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली तरी या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना हमखास नोकरी मिळणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शहर बस सेवेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यानंतर त्यांना एसटी महामंडळाच्या सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’ला दिली.
दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील बेरोजगार तरूणांसाठी एसटी महामंडळाकडून चालक व वाहकांच्या तब्बल ४ हजार ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (मराठा आरक्षण) दिलेल्या १६ टक्के आरक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. या आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविणारे महामंडळ पहिली संस्था ठरले आहे. भरतीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या प्रक्रियेत १६ टक्के आरक्षणानुसार ५०४ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावर केवळ मराठा समाजातील तरूणांनाच संधी मिळणार आहे.
शासनाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली नसली तरी हिरवा कंदीलही दाखविलेला नाही. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मराठा आरक्षणाचा ‘बी प्लॅन’ तयार केला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. भरतीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत शहर बस सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेची पाच वर्षांची जबाबदारी महामंडळाकडे आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
>कंत्राटी नियुक्तीचा पर्याय उपलब्ध
‘शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गात निवड झालेल्यांच्या बाबतीत मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेणे शक्य नसल्यास त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चालविण्यात येणाºया शहर बस वाहतुकीकरिता १५ हजार रुपये रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा पर्याय उपलब्ध राहील,’ असे जाहिरातीत म्हटले आहे.
Post a Comment