0
पूर्णा- अकोला या दोनशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

पूर्णा - अकोला या २०० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार अाहे. या विद्युतीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला दोन ते तीन महिन्यांत सुरुवात होणार आहे, तर संपूर्ण काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होणार अाहे. त्यामुळे मराठवाडा - विदर्भ आणि उत्तर - दक्षिण भारत ते भाग आणखी जवळ येणार आहेत.

सुमारे २०० किलोमीटर अंतर असलेल्या पूर्णा - अकोला या लोहमार्गाचे दहा वर्षांपूर्वी मीटर गेजमधून ब्रॉडगेज रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे या लोहमार्गावरून उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या मोठ्या प्रमाणात आज धावत आहेत. त्यामध्ये जयपूर, अजमेर, दिल्ली, इंदोर, सिकंदराबाद, काकीनाडा, यशवंतपूर, हैदराबाद आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. पूर्णा आणि अकोला रेल्वे स्टेशन दोन्ही रेल्वे स्थानके जंक्शन असून त्याठिकाणाहून वेगवेगळ्या दिशांनी रेल्वे गाड्या जात असतात. त्यामुळे या दोन्ही रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

दोनशे कि.मी.चा आहे मार्ग
पूर्णा- अकोला या दोनशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याबाबत एक महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बैठकीत नांदेड विभागाच्या मुख्य रेल्वे प्रबंधकांनी लोकप्रतिनिधींना माहिती दिली होती. या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी प्रतिकिलोमीटर सुमारे १ कोटीनुसार रेल्वे मंत्रालयाने २१० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

दीड महिन्यात निविदा निघणार
या कामाची निविदा निघण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा दोन महिने उशीर झाला असला, तरी दीड महिन्यात या कामाची निविदा निघणार आहे, तर त्यानंतर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण कामाला लगेच सुरुवात होणार आहे. दीड ते दोन वर्षांमध्ये संपूर्ण दोनशे किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य अाहे. त्यानंतर या महामार्गावर सर्व रेल्वेगाड्या विजेवर चालणार आहेत. या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणार आहे. या रेल्वे गाड्यांना आता अकोला रेल्वे स्टेशनवर डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन बदलण्याची गरज त्यामुळे भासणार नाही. इंजिन बदलण्याच्या कामात अर्धा ते पाऊण तास वेळ जात असतो. हा वेळ वाचणार अाहे. त्याचा फायदा रेल्वे आणि प्रवाशांना होणार आहे.

प्रतिकिलोमीटरला १ कोटीनुसार २१० कोटी रुपयांचा निधी
वसमत फाटा-वाटूर महामार्गामुळे मागास भागाचे भाग्य उजळणार
वसमत फाटा ते वाटूर या ११४.८५ किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे हिंगोली, परभणी व जालना जिल्ह्यांमधील मागास भागांचे भाग्य उजळणार आहे. हा महामार्ग थेट जालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टशी जोडला जात असल्याने, शेतकऱ्यांचा कृषिमाल प्रक्रिया उद्योगात जाऊन कृषी व्यवस्था भक्कम होण्यास मोलाची मदत होणार आहे.

वसमत फाटा- औंढा - जिंतूर - वाटूर फाटा असा हा १४४.८५ किमी लांबीचा रस्ता आहे. पुढे हा महामार्ग जालना - औरंगाबाद महामार्गाला जोडला जाणार आहे. तर वसमत फाटा येथून नांदेड- हैदराबाद महामार्गाला जोडला जात आहे. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथून हिंगोलीपर्यंत सुमारे २३ किमी रस्त्याला याच महामार्गाचा भाग म्हणून मान्यता मिळाली आहे. हे सर्व काम केंद्र शासनाच्या १५०.६० कोटी आणि राज्य शासनाच्या ८२.८२ कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यासह सुरू झाले आहे. वसमत फाटा ते औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूरपर्यंत एका बाजूचे सिमेंट रस्त्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण रस्ता पुढील वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा रस्ता हिंगोली, परभणी आणि जालना या तीन जिल्ह्यांतून जात आहे. या महामार्गामुळे नांदेड जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बऱ्याच गावांना फायदा होणार आहे. मागास भागांना महानगराशी जोडणे आणि त्या माध्यमातून कृषी आणि औद्योगिक विकासाचा समतोल साधणे हा एक हेतू या महामार्ग विकासात आहे. त्याचाच भाग म्हणून जालना येथे होऊ घातलेल्या ड्राय पोर्टशी हे तीन मागास जिल्हे जोडले जाणार आहेत.Hingoli devlopment news 2019

Post a Comment

 
Top