0
नवी दिल्ली :

कामगार नेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८८ वर्षाचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या रोगाने आजारी होते. त्यांना हल्लीच स्वाईन फ्लूची देखील लागण झाली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात आज मंगळवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांना कामगार चळवळीचे पितामह म्हणून ओळखले जाते.


फर्नांडिस हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात संरक्षणमंत्री होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत संरक्षण मंत्रालयाबरोबरच उद्योग, रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी चांगल्यारितीने पार पाडली आहे. १९६७ ते २००४ दरम्यान त्यांनी ९ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

जनता पक्षाच्या सरकारच्या काळात ते उद्योग मंत्री होते. त्यानंतर जनता पक्षाचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी समता पक्षाचा स्थापना केली आणि भाजपला पाठिंबा दिला. आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी १९७७ मध्ये मुझफ्फरपूर येथील लोकसभेची जागा तुरुंगात असतानाही लढविली आणि ही निवडणूक ते विक्रमी मताने जिंकले होते.

फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटकमध्ये ३ जून १९३० मध्ये झाला होता. त्यांना हिंदी, इंग्रजी, तमिळ, मराठी, कन्नड, उर्दू, मल्याळम, तुळू, कोंकणी आणि लॅटिन अशा १० भाषा अवगत होत्या.

फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जॉर्ज साहेब यांनी भारताच्या प्रभावी नेतृत्वाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. ते गरिबांचा मजबूत आवाज होते.

Post a comment

 
Top