0
बेळगाव : 
दारू दुकानासमोर कोणी नशेत डोलणारा दिसला की त्याला गाडीवरून न्यायचे, त्याच्याकडील रक्‍कम लुटायची, असा प्रकार ते दोघे गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. 30 डिसेंबर रोजीही असेच एकाला हेरले, त्याला शेतवडीत नेले व पैसे काढून घेताना काचेच्या ग्लासने डोकीत वार केला. यामध्ये तो ठार झाला. मृताकडून या दोघांना मिळाले अवघे 870 रुपये. परंतु, सदर व्यक्तीला वर्मी घाव लागल्याने ती जागीच ठार झाली.हलग्याच्या युवकाच्या खुनाला वाचा फुटली ती अशी. अवघ्या दहा दिवसांत या खुनाचा शोध घेण्यात माळमारुती पोलिसांना  यश आले. अलारवाडकडे शेतवडीत अनोळखीच्या खुनाची घटना 30 डिसेंबरला उघडकीस आली. ती व्यक्ती उमेश अप्पय्या कुंडेकर (44, रा. हलगा) असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, त्यांचा खून कोणी व कशासाठी केला, हे कळायला दहा दिवस लागले. गुरूप्रसाद महादेव शेटवे (21, हलगेकर बिल्डींग, अनगोळ रोड वडगाव) व प्रवीण गुरूपूत्र चिंदी (23, लक्ष्मी रोड शहापूर) यांनी हा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्या दोघांना अटक झाली आहे.

*खिशात मिळाले 870 रूपये

गुरूप्रसाद व प्रवीण हे दोघे नेहमीच एखाद्या बारसमोर अथवा दुकानासमोर जाऊन थांबायचे. मद्यधुंद असलेला व झोकांड्या देत बाहेर आलेली व्यक्ती दिसली की तिला गाठायचे व तुम्हाला सोडतो, असे सांगून न्यायचे. त्यानंतर त्याला माळरानावर नेऊन लुटायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता.

30 रोजी मद्यधुंद  अवस्थेतील  उमेशना दोघांनी हेरले. त्याचीच गाडी घेऊन घरी सोडतो, असे सांगत त्यांना अलारवाड रस्त्यावरील शेतवडीत नेले. सोबत घेतलेले मद्य पुन्हा तिघे शेतवडीत बसून प्यायले. यानंतर संशयितांपैकी गुरूप्रसादने नशेत उमेशच्या कानाखाली लगावली. यामुळे चिडलेल्या उमेशने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे हे दोघेही चिडले व गुरूप्रसादने काचेचा ग्लास घेऊन उमेशच्या डोकीत मारला. यानंतर दोघांनी उमेश यांना  जबर मारहाण केली. तसेच त्यांची दुचाकी व मोबाईल तसेच खिशातील 870 रूपये घेऊन पलायन केले.

पोलिसांनी दुचाकी व मोबाईल जप्त केला आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या नेतृत्वाखाली माळमारुतीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, की. जी. मुजावर, एम. जी. कुरेर, वाय. पी. नारळेकर, विजय दोड्डमणी, सी. आय. चिगरी, एल. एम. मुशापुरी, एस. जी. लक्कार, ए. बी. मिशी आदींनी याचा तपास घेतला.

बोटे तोडली कुत्र्यांनी

खून झालेल्या उमेशच्या डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याचे दिसत होते. त्यामुळे अघोरी प्रकार असावा, असे वाटत होते. परंतु, रात्री मृतदेहाची बोटे कुत्र्यांनी तोडली असल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

 
Top