0
मुंबई :

इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) बांधण्यात येणार्‍या या स्मारकाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या तीन वर्षांमध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणामार्फत देण्यात आली आहे.


इंदू मिल परिसरातील साडे बारा एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारण्यात येत असून या स्मारकासाठी सुमारे 766 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार डॉ. बाबासाहेबांचे शिल्प साकारत आहेत. या स्मारकामध्ये ग्रंथालय, संशोधन केंद्र इत्यादी सुविधांसह महाड येथील एतिहासिक चवदार तळ्याच्या प्रतिकृतीचाही समावेश करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाखो अनुयायांना निसर्ग सौंदर्याबरोबरच मन:शांतीचाही आनंद देणारे हे स्मारक हरित मानांकनाचाही एक नवा आदर्श घालून देणार आहे.

स्मारकाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांमधून मे शशी प्रभू अ‍ॅड असोसिएट्स आणि डिझाईन असोसिएट्स आय.एन.सी. यांची निवड करण्यात आली आहे. स्मारकाचा बृहत आराखडा अंतिम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित संस्था आणि व्यक्ती यांच्याशी चर्चा करून याबाबतचा कार्यवाही अहवाल शासनास सादर केला असून शासनाने त्याला तत्वतः मान्यता दिली आहे.   

हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या इंडिया युनायटेड मिल क्रमांक 6 येथे प्रस्तावित आहे. या भूखंडाचे  क्षेत्रफळ सुमारे 4.84 हेक्टर (12.5 एकर) एवढे आहे. संपूर्ण भूखंडाचा भू-वापर बदल विशेष औद्योगिक (आय-3) ते रहिवास असा करून तो स्मारकासाठी आरक्षित करण्यात आला आहे. भूखंडाच्या पश्‍चिम बाजूस अरबी समुद्र असून पूर्वेस वीर सावरकर मार्ग आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये

चक्राकृती उतरंडीने पोहोचता येणारा आणि बौध्द वास्तूरचना शैलीतील घुमटावर उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा ताम्रच्छादित पुतळा बांधण्यात येणार आहे.

प्रदर्शनाकरिता दालने, परिक्रमापथ, संशोधन केंद्र, वर्ग ग्रंथालय, परिषदांसाठी सभागृह, ध्यानसाधना केंद्र. पुतळ्यावर समुदाच्या खार्‍या वार्‍याचा परिणाम होऊ म्हणून विषेश उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, बगीचे, स्मरणिका व पुस्तक विक्री केंद्र, प्रतिक्षालय, प्रशाकीय कार्यालय, स्वच्छतागृह, वाहनतळ अशी वास्तू असलेले स्मारक बांधण्यात येणार आहे.

Post a comment

 
Top