0
या घटनेनंतर अंबाजोगाई शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अंबाजोगाई- नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय जोगदंड यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १८ ) रात्री सातच्या सुमारास घडली. प्रथम माहितीनुसार त्यांच्या लहान भावाचे गल्लीतील काही लोकांशी भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी जोगदंड गेले असता एकाने विजय जोगदंड यांच्यावरच कोयत्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन जोगदंड यांचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अंबाजोगाई शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती व चर्चेनुसार शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विजय जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस अंबाजोगाई) यांचे लहान बंधू नितीन जोगदंड यांचे भावकीतीलच भगवान जोगदंड यांच्या मुलांसोबत भांडण सुरू होते. ही माहिती कळाल्यानंतर विजय जोगदंड तेथे पोहोचले. नितीन यांना मारहाण होत असताना विजय यांनी त्यास बाजूला काढले असता दोघांनी तलवार आणि कोयत्याने केलेले वार विजय जोगदंड यांच्यावरच पडले. यात छाती आणि मुंडक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वाराती रुग्णालयात पोलिसांनी धाव घेतली.

८ वाजताच शहर बंद :
जाेगदंड यांचा खून झाल्याची माहिती कानोकानी शहरात पसरली. या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी पटापट आपली दुकाने बंद केली. स्वाराती रुग्णालय परिसरातही मोठा तणाव होता. रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्ते आणि जोगदंड यांचे नातलग रुग्णालयात थांबून होते.

प्रेमविवाहाचे कारण?
विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी भावकीतीलच एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. यामुळे भगवान जोगदंड परिवारातील सदस्य नितीन जोगदंडवर नाराज होते. यातूनच ही घटना घडली असल्याची चर्चा परळी वेस परिसरात होती. रात्री उशिरापर्यंत जोगदंड कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. तथापि, पोलिसांकडूनही माध्यमांना काहीही माहिती देण्यात आली नाही.

दोन वर्षांपूर्वी नगरसेवक म्हणून विजयी
दोन वर्षांपूर्वी भाजपच्या तिकिटावर विजय जोगदंड निवडून आले होते. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. अंबाजोगाई शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यासाठी जोगदंड यांचा मोठा पुढाकार होता. अंबाजोगाई शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्यांनी आवाज उठवला होता. विजय जोगदंड यांच्या आई ,पत्नी, चार भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात विजय जोगदंड यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्वाराती रुग्णालय परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच शहरातही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

BJP corp-orator Jogdand's murder on Ambajogai

Post a Comment

 
Top