0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा

बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्वासनं द्यायची आणि नंतर ढुंकूनही पहायचं नाही हेच मोदीराज्य अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपावर आणि मोदींवर निशाणा साधला. एवढंच नाही तर दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

या सरकारने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्यांना मदतही करत नाही. त्यामुळे जे शेतकऱ्याशी इमान राखत नाहीत त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही असे पवार यांनी म्हटले आहे. बारामतीत कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

सरकारने आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. ग्रामीण आणि शहरी विभागातील शिक्षणाचा दर्जा पाहिला तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांसमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये ग्रामीण तरुणांचं स्थान अस्थिर होईल अशीही भीती पवार यांनी व्यक्त केली. मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत देशातलं वातावरण बदललं आहे. मागील राज्यकर्त्यांबद्दल जनतेच्या काही तक्रारी होत्या. आत्ताच्या राज्यकर्त्यांना शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक यांच्याबद्दल काहीही घेणंदेणं नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

 
Top