0
मुंबई  :

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचे अक्षरशः हाल झाले. संपाचा फायदा घेत, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शेअरच्या माध्यमातून दामदुप्पट भाडे आकारत मुंबईकरांची लुट केली. त्यामुळे  काहींनी पायीच रेल्वे स्टेशन गाठले.

बेस्टच्या अर्थसंकल्पाचे पालिकेत विलिनिकरण करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सोमवारी रात्री ११ वाजल्यापासून कुर्ला, देवनार, पोयसर, मालाड, दिडोशी, वडाळा यासह अन्य  आगारातील रात्रपाळीचे चालक आणि वाहक कामावर आले नाहीत. त्यामुळे पहाटे आगाराबाहेर बस पडल्या नाहीत. सकाळी बदली कामगारांच्या सहकार्याने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. पण, २७ आगारातून एकही बस बाहेर पडू शकली नाही. सकाळी उपनगरातील खार, बांद्रा, अंधेरी, सातबंगला, वेसावे, मरोळ, गोरेगाव, मालवणी, गोराई, चारकोप, भांडूप, घाटकोपर आदी भागातून कामावर निघालेल्या चाकरमान्यांनी खाजगी बसचा आधार घेत रेल्वे स्टेशन गाठले.

खाजगी बसची संख्या कमी असल्यामुळे अनेकांनी रिक्षा आणि टॅक्सीचा आधार घेतला. तर काहींनी चालत स्टेशन पर्यंत जाणे पसंत केले. चर्चगेट आणि सीएसएमटी येथे उतरून अनेकांनी दामदुप्पट भाडे देऊन आपल्या कार्यालयापर्यंत प्रवास  केला.

ओला उबेर हाऊसफुल्ल
बस संपामुळे अनेकांनी ओला उबेर टॅक्सी आरक्षित केल्याने सकाळी टॅक्सीचे ऑनलाईन बुकींग होण्यास विलंब होत होता. टॅक्सी बुकींग  झालीच तर किमान २० ते २५ मिनिट प्रतिक्षा करावी लागत आहे. असे काही प्रवाशांनी सांगितले.

लोकलची गर्दी वाढली
संपामुळे अनेकांनी रेल्वेचा पर्याय निवडला. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट मार्गासह मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धावणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Post a Comment

 
Top