टाकळी अमियातील प्रकार
- कडा- सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने शाळेतील वर्ग खोलीबाहेर रांगोळी काढणाऱ्या तीन विद्यार्थिनींच्या अंगावर पडवीचे पत्रे पडून जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. तीनही मुलींना उपचारासाठी कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविता मिरड (५ वी), गायत्री चौधरी (७ वी), सानिका चौधरी (५ वी) अशी जखमी मुलींची नावे आहेत.
टाकळी अमिया येथे बीड जिल्हा परिषदेची सातवी पर्यंत शाळा असून शाळेमध्ये गुरुवारी निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामुळे सकाळी दहा वाजता परिपाठ आटोपल्यानंतर हे प्रात्यक्षिक देण्यासाठीची तयारी सुरू होती. तर याच वेळी सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थिनी वर्गासमोर रांगोळी काढत होत्या . व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. यातील काही जण पडवीचे पत्रे उभा करण्यात आलेल्या खांबाला काही जण खेटून उभे राहिल्याने त्यावरील पत्रे अचानक खाली कोसळली. त्यामुळे रांगोळी काढणाऱ्या सविता मिरड (इयत्ता ५ वी), गायत्री चौधरी (इयत्ता ७ वी), सानिका चौधरी (इयत्ता ५ वी) या तीन मुली पत्रे खरचटल्याने जखमी झाल्या असून कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विस्तार अधिकारी श्रीराम कनाके यांनी शाळेला भेट दिली असून वारंवार शाळा दुरुस्ती प्रस्ताव पाठवून त्याची शिक्षण विभाग दखल घेत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला.
Post a Comment