0
इथे ओशाळली माणूसकी : मुलाचे लग्न १२ दिवसांवर असताना पत्रिका वाटपास गेलेला पिता ठार

जळगाव : अवघ्या १२ दिवसांवर मुलाचे लग्न येऊन ठेपलेले असताना त्याच्या लग्नपत्रिका वाटप करीत असलेल्या पित्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२.१५ वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावरील खेडी गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर जखमी २० मिनिटे विव्हळला. मात्र, मदतीसाठी एकही वाहनचालक थांबला नव्हता. काही वेळाने जखमीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ताेपर्यंत उशिर झाला हाेता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम उत्तम पाटील (वय ५०, रा. खडके, ता. एरंडोल) असे मृत वरपित्याचे नाव आहे. पाटील यांचा लहान मुलगा गणेश याचे १० फेब्रुवारी रोजी लग्न आहे. त्या निमित्ताने पाटील हे बुधवारी खेडी (ता. जळगाव) येथे नातेवाईकांकडे लग्नपत्रिका देण्यासाठी आले होते. घराकडे परत जात असताना महामार्गावरील हॉटेल गौरवसमोर त्यांच्या दुचाकीस (एमएच १९ एव्ही ७०४९) अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामुळे पाटील रस्त्याच्या कडेला जावून कोसळले. अपघातानंतर वाहनचालक थांबला नाही. रस्त्यावर इतर वाहनचालकांनी या अपघाताकडे दुर्लक्ष केले. परिसरातील काही नागरिकांनी पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. पाटील बेशुद्ध असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर त्यांच्या मोबाइलमधील काही क्रमांकावर फोन करुन माहिती देण्यात आली. त्यानुसार नातेवाईकांना या अपघाताची माहिती मिळाली. दुपारी ३ वाजता पाटील यांच्या कुटंुबियांसह जळगावातील नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. शवविच्छेदन गुरुवारी करून मृतदेह कुटंुबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात वाहनचाकलावर गुन्हा दाखल करण्यात आला.


जखमीस वेळीच मिळाली नाही मदत 
अपघात झाल्यानंतर पाटील हे जखमी अवस्थेत विव्हळत होते. असे असताना देखील धडक देणाऱ्या वाहनचालकासह इतरांनी तेथे न थांबता निघून गेले. काही वेळाने परिसरातील नागरीकांनी पाटील यांना रुग्णालयात आणले. त्यांच्या छातीवर गंभीर दुखापत झाली होती. वेळीच उपचार झाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले आहे. परंतू, महामार्गावरील वाहनचालकांनी माणुसकी विसरत जखमी पाटील यांना रुग्णालयात आणले नाही. उपचाराअभावी अखेर त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची दुचाकी मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत घटनास्थळावरच पडून होती.

पाटील कुटुंबावर शोककळा 
अवघ्या १२ दिवसांवर गणेशचे लग्न होते. त्यामुळे घरात मंगलमय वातावरणासह लग्नाची लगबग सुरू होती. त्यातच वरपित्यावर ओढावलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण कुटंुबावर शोककळा पसरली. या एका घटनेने संपूर्ण उत्साह, आनंदावर विरजन पडले. या घटनेनंतर पाटील कुटंुबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शेतकरी असलेले पाटील यांच्या पश्चात पत्नी, दिनेश व गणेश अशी दोन मुले असा परिवार आहे.


अपघातांची मालिका सुरूच 
शहरातून जाणारा महामार्ग अत्यंत अरुंद आहे. चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. खेडी पुलाजवळ महामार्ग धोकादायक झाला आहे. दोन मोठी वाहने समोरा-समोरुन जात असताना दुचाकीसाठी सुद्धा रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा दुचाकी घसतात. मोठ्या वाहनांचे कट लागून दुचाकीस्वार खाली काेसळतात. मात्र, तरीही प्रशासनाकडून ठोस उपाय-योजना केली जात नाही.

यामुळे होत आहेत अपघात

महामार्ग चाैपदरीकरणाचे काम रखडले आहे. वाहतूक वाढल्याने अरुंद मार्गावर अपघात वाढताहेत. कालिंका माता मंदिर ते खेडी गावापर्यंत साइडपट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळेही अपघात हाेतात.
Truck and bike accident in Jalgaon

Post a comment

 
Top