दोन गरीब शेतकऱ्यांचा आत्मा यमलोकात पोहोचला, यमदेव म्हणाले तुमच्या दोघांचेही आयुष्य खूप चांगले राहिले, पुढील जन्मात काय
प्राचीन काळी एका गावात दोन शेतकरी राहत होते. दोघेही गरीब होते आणि फार हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होते. दोघांकडेही थोडी-थोडी जमीन होती. त्याच जमिनीतून अन्न-धान्यची व्यवस्था करत होते. एके दिवशी संयोगाने दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला. दोघांचाही आत्मा यमलोकात पोहोचला. यमलोकात यमदेव म्हणाले की, तुमच्या दोघांचेही आयुष्य खूप चांगले राहिले, पुढील जन्मात तुम्हाला काय होण्याची इच्छा आहे? हे ऐकून एक शेतकरी क्रोधीत झाला. क्रोधामध्ये तो यमदेवाला म्हणाला- अस्युह्यभर मी कंगाल राहिलो. मी दिवस-रात्र कष्ट केले, शेतामध्ये बैलांप्रमाणे काम केले परंतु एक-एक पैशांसाठी माझे कुटुंब झगडत होते. असे जीवन चांगले कसे?
> हे ऐकून यमदेव म्हणाले की, ठीक आहे, आता पुढील जन्मासाठी तू काय विचार केलास?
> शेतकरी म्हणाला, देवा मला पुढील जन्म असा दे, ज्यामुळे मला कधीही कोणाला काहीच द्यावे लागणार नाही, माझ्या चारही बाजूला पैसाच पैसा असेल.
> यमदेव तथास्तु म्हणाले आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेले.
> दुसरा शेतकरी म्हणाला, देवा तुम्ही मला सर्वकाही दिले. चांगले कुटुंब, थोडी जमीन, ज्यामध्ये मी माझे आणि माझया कुटुंबियांचे पालन करत होतो. जीवनात सुख-शांती होती. फक्त एकच कमतरता होती, ती म्हणजे कधीकधी माझ्या घरी आलेल्या भुकेल्या लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवत होतो, कारण माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीही शिल्लक राहत नव्हते.
> यमदेवाने विचारले, तर मग पुढील जन्मात काय हवे आहे?
> शेतकरी म्हणाला, देवा जास्त काही नको परंतु माझ्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जाणार नाही अशी व्यवस्था कर. जे व्यक्ती माझ्या घरी येईल त्याला पोटभर जेवू घालू शकेल अशी व्यवस्था कर. यमदेव तथास्तु म्हणाले.
> दोन्ही शेतकऱ्यांचा पुन्हा जन्म झाला. क्रोध करणारा शेतकरी गावातील सर्वात मोठा भिकारी बनला. रस्त्यावरून ये-जा करणारे सर्व लोक त्याला पैसे देत होते आणि त्याला कोणालाही काही द्यावे लागत नव्हते.
> दुसरा शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. त्याच्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नव्हता. तो धन-धान्य देऊन प्रत्येकाची मदत करत होता.
कथेची शिकवण अशी आहे की- देवाने आपल्याला जेवढे दिले आहे त्यामध्ये संतुष्ट राहावे. काळ चांगला किंवा वाईट नसतो, आपले विचारच काळाला चांगले किंवा वाईट बनवतात. नेहमी सकारात्मक विचार असल्यास आपल्याला वाईट काळातही सुख मिळू शकते. जसे की दुसरा शेतकरी आपल्या जीवनात सुखी होता.

Post a Comment