0
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा आरोप, शिवसेना भिडण्यास खंबीर

नगर - शिवसेनेच्या त्रासामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगितले असले, तरी पैसे घेऊन त्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. असे आरोप केले, तर शिवसेना तुम्हाला भिडण्यासाठी खंबीर आहे, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.


राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाकडे सादर केलेल्या खुलाशानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी राठोड म्हणाले, राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या नेत्यांना भाजपला पाठिंबा दिल्याबाबत खुलासा सादर केला आहे. पण या खुलाशात शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहराचा नावलौकिक खराब केला आहे. निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या होते, उद्योजक आत्महत्या करतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कधीही उचलून नेले जाते. असे प्रकार २५ वर्षांत कधी घडले नव्हते, ते आता घडत आहेत. शिवसेनेच्या त्रासामुळे भाजपला पाठिंबा िदल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे, पण पैसे घेऊन त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा जनतेत आहे. भाजपला विकासासाठी पाठिंबा दिल्याचे तुम्हीच अगोदर सांगितले होते, आता तुम्ही म्हणता भितीमुळे पाठिंबा देतोय. त्यांनी त्यांच्या नेत्यांना, पक्षाला व नगरच्या जनतेला फसवले आहे. दादा कळमकर यांनाही फसवले आहे, असे राठोड म्हणाले.


सोयराधायऱ्यांची टोळी शहरात वेगळ्या पद्धतीचे राजकारण करत आहे. शिवसेनेवर जर असे आरोप केले, तर शिवसेना तुम्हाला भिडण्यासाठी खंबीर आहे. चुकीचे बोलाल, तर शिवसेना सहन करणार नाही. तुम्ही केलेले पाप आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. तुम्ही भाजपला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला की, शिवसेनेने त्रास दिला म्हणून दिला की, पैसे घेऊन दिला ते एकदा ठरवा, मग उत्तर द्या. यांनी केडगावचा सौदा केला, पैसेही घेतले, नेत्यांचेही ऐकले नाही, अशी टीका राठोड यांनी केली.


भाजपकडूनच त्यांनी लढायला हवे होते
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याऐवजी भाजपकडूनच महापालिका निवडणूक लढवायला हवी होती. शिवसेनेच्या त्रासामुळे निर्णय घेतल्याचे सांगता, तर भाजपचे चिन्ह घ्यायला हवे होते, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना लगावला.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवाईकडे लक्ष
भाजपला पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने नगरसेवकांना नोटिसा बजावल्या. खुलासाही सादर करण्यात आला. आता या खुलाशावर पक्षाकडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही कारवाई काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.


...तर स्थायी समितीची गणिते बदलणार
सध्याच्या संख्याबळानुसार स्थायी समितीत शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँग्रेस ५, भाजप ३, काँग्रेस १, बसप १ अशी स्थिती आहे. पण बसपच्या ६ जणांची गटनोंदणी यशस्वी झाल्यास स्थायीची समितीतील सदस्य कोट्याची गणित बदलणार आहे. एका सदस्याचे मूल्य ४.२५ आहे. त्यानुसार पक्षाच्या किंवा गटाच्या संख्येच्या प्रमाणात शिवसेना ६, राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाजप ३, बसप २ तर काँग्रेसला १ सदस्य स्थायीत पाठवता येईल. यात राष्ट्रवादीची एक जागा कमी, तर बसपची एक वाढल्याचे दिसते. स्वीकृत सदस्य निवडीतही काँग्रेसला फटका बसून बसपाला एक जागा मिळू शकते.ahmednagar corporation political party war

Post a Comment

 
Top