0
सातारा : 

मी नुसता स्पेशालिस्ट नाही; तर सर्व आजारांवर मात करून माझं काम करत असतो. त्यामुळे कधी-कधी मल्टिपर्पज हॉस्पिटल हे आपलंच घर वाटतं. माझ्या अगोदर  बोललेल्यांमध्ये डॉ. श्रीखंडेंनी एक महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला केले आहे. उदयनराजे, त्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की, डोकं शांत ठेवा. त्यांनी कुणासाठी सांगितली मला माहीत नाही. डॉक्टरांनी केलेले हे मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी दिला.


सातारा येथील यशवंत हॉस्पिटल अँड डायग्‍नोसिसच्या कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी काही सूचक राजकीय वक्‍तव्ये केली. कार्यक्रमास आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, डॉ. अनिल पाटील, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. प्रीती पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. श्रीखंडे यांनी आपल्या भाषणात डोकं शांत ठेवण्याचा सल्‍ला दिला होता. तो धागा पकडून खा. शरद पवार यांनी राजकीय चातुर्य दाखवले. उदयनराजेंचा उल्‍लेख करून ते म्हणाले, डॉक्टरांनी डोकं शांत ठेवा असे सांगितले आहे. पण ते कुणासाठी सांगितले हे माहीत नाही. त्यातील सत्यता आपण दोघंही स्वीकारू. कारण डॉक्टरांनी केलेलं हे मार्गदर्शन असून त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, डोकं शांत ठेवायला हवं,  असे वक्‍तव्य पवारांनी खा. उदयनराजेंना संबोधून केले.

पवार पुढे म्हणाले, दुष्काळावर मात करायची हिंमत या भागातील लोकांच्यात आहे. ज्या ब्रिटिशांच्या राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची ताकद सातारा, सांगली या परिसरातील लोकांनी दाखवली. रडण्याची प्रवृत्ती याठिकाणच्या लोकांच्यात  नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, डॉ. अनिल पाटील यांनीही भाषणे केली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवाध्यक्ष तेजस शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top