0
जत : 

देवनाळ (ता. जत) येथील गीता महादेव वाघमोडे (वय 18) ही युवती शेततलावात पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरून पडून तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गीता ही जत येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होती. पाणीटंचाईने मुलीचा बळी गेल्याची चर्चा सुरू होती.

देवनाळ येथे पाणीटंचाई आहे.पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण करीत आहेत. वाघमोडे कुटुंब देवनाळ गावातच  राहतात. गीताला रविवारी शाळेला सुट्टी होती. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात पाणी नसल्याने ती एका शेततळ्यात पाणी आणावयास गेली होती.शेततळ्यातील प्लास्टिक कागदावरून पाय घसरल्याने ती पाण्यात बुडाली.गीताचा छोटा भाऊ नामदेव याला बहीण शेततळ्यात पडल्याचे दिसले. त्याने आरडाओरडा केला. लोक त्या ठिकाणी जमा झाले. गीताला जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले.

वडील महादेव वाघमोडे यांनी फिर्याद दिली. पोलिस नाईक सचिन हाक्के तपास करीत आहे. जत तालुक्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे टँकरची मागणी करूनही वेळेवर मिळत नाही. तरी प्रशासनाने गांभीर्याने  टंचाई हाताळावी,  असे मत देवनाळचे माजी सरपंच सदाशिव जाधव यांनी व्यक्त केले.

Post a Comment

 
Top