0
खोतकर यांची भूमिका ठरणार निर्णायक

जालना : राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दानवे-खोतकर लढत आपल्या पथ्यावर पडू शकते या अपेक्षेमुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने १७ अर्ज आले आहेत. यात आमदार अब्दूल सत्तार, सुभाष झांबड यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातून डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, विलास औताडे अशा १२ लोकांनी उमेदवारी मागितली आहे तर जालना जिल्ह्यातूनही राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे यांच्यासह पाच जण इच्छुक आहेत.


औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात आता निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून चौथ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. दानवेंविरुद्ध तुल्यबळ उमेदवारच नाही, असा प्रचार भाजप पदाधिकारी करीत होते. मात्र शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. २५ वर्षांची राजकीय मैत्री विसरून या दोघांनी एकमेकांविरोधात रान पेटवले आहे. या दोघांमध्ये हा संघर्ष सुरू असताना काँग्रेेसनेही उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले असून २५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून १७ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी खासदार दानवे यांच्याविराेधात निवडणूक लढवलेले माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्यासह विलास औताडे यांनीही पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार, आमदार सुभाष झांबड, नामदेवराव पवार, रवींद्र बनसोड यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील १२ जणांचा समावेश आहे. तर जालना जिल्ह्यातूनही पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अंबडचे बाबूराव कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, युवक काँग्रेसचे सत्संग मुंडे आदींनी आपला अर्ज पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे.


२००९ च्या धर्तीवर आकडेमोड :

२०१४ च्या निवडणुकीत खासदार दानवे २ लाख ६ हजार ७९८ मतांनी दानवे विजयी झाले होते. त्यांना ५ लाख ९१ हजार ४२८ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे विलास औताडे यांना ३ लाख ८४ हजार मते मिळाली होती. मात्र आता मोदी लाट अोसरल्याचे सांगत भाजप वगळता इतर सर्वच पक्ष २००९ च्या धर्तीवरच संभाव्य लढतीची आकडेमोड करीत आहेत. २००९ मध्ये दानवे यांना ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली होती तर डॉ.कल्याण काळे यांना ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. त्यावेळी दानवे ८ हजार ८८२ च्या मताधिक्याने विजयी झाले होते.


पडद्याआडचे उमेदवार
काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्याने चांगलीच रस्सीखेच होईल असे चित्र आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या उमेदवाराला काँग्रेसकडून संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. खुद्द आ. सत्तार यांनीही पडद्याआडचे उमेदवार वेगळे आहेत असे सांगितले आहे. मात्र राहुल गांधी देतील तोच काँग्रेसचा उमेदवार असेल. अशी पुष्टीही त्यांनी जोडली.


काँग्रेस प्रदेश समितीकडे अहवाल देणार
औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघात काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष आमदार सत्तार यांच्यासोबत एकत्रित अहवाल प्रदेश समितीकडे देण्यात येईल. त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेईल. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस.


कशामुळे वाढले इच्छुक
२०१४ मध्ये असलेली मोदी लाट आता नाही असा विश्वास भाजप व्यतिरिक्त सर्वच पक्ष व्यक्त करीत आहेत. त्याशिवाय जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर उमदेवार असल्यास दानवे-खोतकर यांच्यातील मतविभाजनाचा फायदा मिळू शकतो, असाही विश्वास काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.


Jalna Loksabha - Sattar, Autade and kale are interested

Post a Comment

 
Top