0
खासदार शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.
पाथर्डी- दुष्काळ फक्त जाहीर केला, उपाययोजना कधी करणार? २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणार असून खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे भाजपचे कमळ राज्यात औषधालाही शिल्लक राहणार नाही. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यात विरोधकही कमी पडत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली.

खोजेवाडी (निवडुंगे) येथे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरु केलेल्या राज्यातील पहिल्या जनावरांच्या छावणीला शेट्टी यांनी भेट दिली छावणीसाठी पाच टन चारा देत मकरसंक्रांतीची त्यांनी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, रवी मोरे, दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, हंसराज वडगुले, संतोष आहेर, डॉ. कृषिराज टकले, संदीप राजळे, भानुदास गर्जे, माउली वराडे, वसंत मरकड, सत्यवान बबन बर्डे, राजेंद्र बर्डे, नानासाहेब भगत, बाबासाहेब बुधवंत, विठ्ठल कोलते, सेन्हा भिटे आदी उपस्थित होते.

खासदार शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यात विरोधक कमी पडले. सीबीआय आणि ईडी या सरकारच्या दोन हस्तकांपुढे विरोधक घायाळ झाले आहेत. त्यामुळे भाजपची सत्तेची मस्ती वाढली. शेतकऱ्यांना २०१४ च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पायदळी तुडवली गेली. यापुढील निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन न पाळणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द होणार असल्याने खोटे बोलणाऱ्या नेत्याला व त्याच्या पक्षाला यापुढे घरी बसावे लागणार आहे. माळावर जाऊन बोंबलायला पाटलाची गरज लागत नाही. त्या पध्दतीन दुष्काळ जाहीर केला, परंतु अडीच महिने झाले उपाययोजना काहीच नाहीत, असे ते म्हणाले. तीन राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान जमिनीवर आले. जनकी बात सुनो म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगत सावंत यांनी मोदींवर टीका केली.
Raju Shetty warn BJP 

Post a Comment

 
Top