0
आपल्या शरीराचे आरोग्य राखण्याकरीता तांबा हा धातू महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे कार्य व्यवस्थित चालू राहावे याकरीता शरीरात तांब्याचे प्रमाण असणे आवश्यक असते. आपली चयापचय क्रिया चांगली रहावी याकरीता या धातूचा उपयोग होतो. हिमोग्लोबीनच्या संश्लेषणाकरीता या धातूचा उपयोग होतो. लोहाच्या मदतीने हा धातू शरीरात तांबड्या रक्‍तपेशी निर्माण करण्याचे काम करत असतो. याखेरीज आपली प्रतिकारशक्‍ती वाढवण्याचे कामही या धातूमुळे केले जाते. थायरॉईड ग्रंथींचे कार्य व्यवस्थीत चालू रहावे याकरीताही हा धातू उपयुक्‍त असतो. त्याचबरोबर हाडे बळकट बनवण्यासाठी हा धातू सहाय्यकारी ठरतो. मासे, होलग्रेन्स, चॉकलेट, शेंगदाणे, गहू, लिंबु, नारळ, पपई, सफरचंद, डाळी, बटाटा, मशरुम, हिरव्या पालेभाज्या, चहा, तांदुळ, चिकन यामधून आपल्या शरीराला कॉपरचा पुरवठा होऊ शकतो.

त्यामुळे या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायलाच हवा. शरीरात या धातूची कमतरता आहे हे अनेक लक्षणातून दिसू शकते. अ‍ॅनिमिया झाल्यास, सांधे आणि हाडे दुखू लागल्यास, ऑस्टीओपोरोसीससारखी व्याधी झाल्यास, शरीरातील एलडीएल कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढल्यास, वारंवार संसर्ग होऊ लागल्यास, केस गळू लागल्यास, सतत थकवा जाणवू लागल्यास तसेच श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यास आपल्या शरीरात या धातूची कमतरता आहे असे समजावे. थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडल्यासही या धातूची कमतरता आहे असा निष्कर्ष काढला जातो. जादा प्रमाणात हा धातू शरीरात गेल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. यकृत, मेंदू यांसारख्या अवयवात या धातूचे प्रमाण वाढले तर हिपेटायटीस, मुत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. त्याबरोबरच आपल्या मेंदूच्या कार्यातही बिघाड होतो.
- विनायक सरदेसाई

Post a Comment

 
Top