0
नवी दिल्ली : 

आयकर भरण्याची आणि आयकर परतावा मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी, केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आयकर भरण्यासाठीचे ई-फिलिंग पोर्टल आणि सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोयल म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयकर भरण्यासाठीचे ई-फिलिंग पोर्टल आणि पुढील प्रक्रियेसाठीचे सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) या दोहोंचे एकत्रीकरण करीत एकिकृत यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 4 हजार 241.97 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

पुढील कालावधीसाठी या एकत्रित पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असून, त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या कामाचे सुलभीकरण होण्यासोबतच कामाचा वेगदेखील वाढणार आहे. वेग वाढण्यासोबतच संपूर्ण प्रक्रियेतील अचूकतादेखील यामुळे वाढणार आहे. या पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आयकर परतावा मिळविण्यासाठीचा कालावधी मोठ्या लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सध्या परतावा मिळण्याची प्रक्रिया ही 63 दिवस एवढी दीर्घ आहे, या एकिकृत यंत्रणेमुळे तो कालावधी केवळ एकच दिवसाचा होणार आहे. या पोर्टलमुळे संपूर्ण प्रक्रियेतील कालावधी कमी होण्योसोबतच प्रक्रियेत होणार्‍या चुकांच्या प्रमाणातदेखील घट होणार आहे. आयकर विभाग डिजिटल मीडियाचा वापर करून आवश्यक ती माहिती करदात्यांपर्यंत पोहोचविणार आहे, असेही गोयल यांनी नमूद केले.

आयकर विभागाचे ई-फिलिंग पोर्टल अतिशय यशस्वी ठरले असल्याचे सांगत गोयल पुढे म्हणाले की, असे पोर्टल तयार करण्याचा विभागाचा निर्णय अतिशय यशस्वीपणे राबविला जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून करदात्यांना ऑनलाईन पद्धतीने आयकर भरणे शक्य झाले आहे.

Post a Comment

 
Top