0
नागपूर :

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे’ असे काव्यमय भाषेत म्हटले जाते; पण काही प्रेमवीरांच्या लीलाही अशा भन्नाट असतात की, त्यांनाही कसली उपमा देता येत नाही! एरव्ही पोलिस ठाण्यात लोक चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी जात असतात. नागपूरमध्ये एक तरुण आपले हृदय चोरीला गेले, अशी तक्रार नोंदवण्यासाठी गेला. एका तरुणीने आपले हृदय चोरले असून पोलिसांनी तिच्याकडे ते शोधून आपल्याला परत आणून द्यावे, असे त्याने सांगितले. यावर पोलिसांना काय करावे समजेना!

पोलिस आयुक्त उपाध्याय यांनीच हा किस्सा पत्रकारांना सांगितला. ते म्हणाले, आम्ही अनेक चोरांना पकडून चोरीस गेलेल्या वस्तू लोकांना परत करतो; पण काही वेळा अशा तक्रारी येतात की, आम्हाला काय करावे समजत नाही. अलीकडेच हा तरुण पोलिस ठाण्यात आपले हृदय चोरीला गेले, असे म्हणत आला होता. माझी तक्रार नोंदवून घ्यावी व माझे हृदय मला परत आणून द्यावे, असा तो हट्ट करू लागला. यावर पोलिसही बुचकळ्यात पडले आणि ठाण्यातील पोलिसांनी वरिष्ठांकडे सल्ला मागितला. शेवटी एका पोलिस अधिकार्‍याने प्रेमाने घायाळ झालेल्या या तरुणाला कायद्याची पुस्तके दाखवून अशा प्रकारची कोणतीही तक्रार नोंदवून घेण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे त्याच्या निदर्शनाला आणून दिले व त्याची समजूत काढून त्याला परत पाठवून दिले!

Post a Comment

 
Top