0
डोंबिवली : 

सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीची यूपी-बिहारकडे वाटचाल होत असल्याचे एका घटनेतून समोर आले आहे. फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांच्या विक्रीचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला यश आले आहे. या युनिटने डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवळल्या.

या दुकानातून तब्बल 170 प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.धनंजय अनंत कुलकर्णी (49) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून कल्याण कोर्टात मंगळवारी हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयाने कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे.

धनंजय कुलकर्णी हे टिळकनगरमधील न्यू दीपज्योत सोसायटीत राहत असून त्यांचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहंत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे. या दुकानात  मोठ्या प्रमाणात प्राणघात हत्यारांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस गिर्‍हाईक पाठवून क्राईम ब्रँचने प्रथम खात्री केली. त्यानुसार सपोनि संतोष शेवाळे, फौजदार निलेश पाटील, शरद पंजे, जमादार ज्योतिराम साळुंखे, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, प्रकाश पाटील, हरिश्‍चंद्र बांगारा, राहुल ईशी यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकली.

इतक्या मोठ्या प्रमाणाव शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे पाहून पोलीसही अवाक् झाले. रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍या, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला. हा दुकानदार गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शस्त्रे विक्री करत असल्याचा क्राईम ब्रँचला संशय आहे. या दुकानदाराने गुंड- गुन्हेगारांना किती शस्त्रांची विक्री केली, त्या दिशेने देखील चौकशी क्राईम ब्रँच करत आहे.

आरोपी धनंजय कुलकर्णी हा कर्जबाजारी असून गेल्या 8-9 महिन्यांपासून सदर दुकानात शस्त्रास्त्रे विक्री करत आहे. ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट तसेच पंजाब, राजस्थान राज्यातून आणली आहेत.3 ते 5 हजारांत याने तलवारींचीविक्री केली. मराठा तलवार 5 हजार, राजस्थान आणि पंजाब तलवार 4 हजार, चॉपर आणि कुकरी 2 ते 3 हजार, असे या शास्त्रांचे त्याने दर ठेवले आहेत.





Post a Comment

 
Top