0
कराड :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक माजी उपगनगराध्यक्ष मनोहर शिंदे गटाने निसटता विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष, भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कडवी लढत दिली. त्‍यामुळे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलम येडगे यांना अवघ्या २७० मतांनी विजय मिळाला. येडगे यांना ७ हजार ७४७ मते मिळाली. तर भाजपाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांना ७  हजार ४७७ मते मिळाली आहेत. बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मलकापूरमध्ये भाजपला मिळालेली मते पाहता काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागणार आहे.


कराड : मलकापूर नगरपरिषदेत काँग्रेसची बाजी

या निवडणुकीत शिवसेना कराड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष काँग्रेस उमेदवार मोहन शिंगाडे, माजी नगरसेविका भाजपच्या उमेदवार उमा शिंदे, माजी उपसरपंच भाजप उमेदवार सुहास कदम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांचाही पराभव झाला आहे. त्याचबरोबर मलकापूर नगरपंचायतीमध्ये विरोधी गटनेते म्हणून काम केलेले भाजपचे उमेदवार हणमंतराव जाधव यांनाही पराभवास सामोरे जावे लागले आहे.

वाचा :  काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी

एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही भाजपने दिलेली लढत पाहता माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आता सावधपणे पावले उचलावी लागणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाने मतभेद विसरून आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला केलेली मदतच या निवडणुकीत निर्णायक ठरली. त्याचबरोबर विजयाच्या एवढ्या समीप जाऊनही पराभवाचे तोंड पहावे लागल्याने झालेल्या चुकातून बोध घेत कराड दक्षिणमधील परिवर्तनासाठी भाजपला यापुढे मार्गाक्रमण करावे लागणार आहे.

Post a comment

 
Top