आपल्या धडाकेबाज फलंदाजीने आणि स्टाईलने नेहमीच चर्चेत असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कोहली आपल्या फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असतो. अधिक फिटनेससाठी आता त्याला कृषी विज्ञान केंद्राने कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला दिला आहे.
मध्य प्रदेशातील जाबुआ येथे हे कृषी विज्ञान केंद्र आहे. या कृषी विज्ञान केंद्राने बीसीसीआय आणि विराट कोहलीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विराटला कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला दिला आहे. 'राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या म्हणण्याणुसार, झाबुआतील कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते, तर लोह आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे येथील कडकनाथ कोंबड्यांचा समावेश आपल्या आहारात करावा' अशी विनंती या कृषी विज्ञान केंद्राने केली आहे.
‘विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडू आपल्या आहारात ग्रिल्ड चिकन खात असल्याची आम्हाला प्रसार माध्यमातून माहती मिळाली. परुंतु, ग्रिल्ड चिकनमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुम्ही वेगन डाएट (प्राणीजन्य पदार्थ वर्ज करणारे)आत्मसात केल्याचेही समजले. त्यामुळे कोहलीने कमी कोलेस्ट्रॉल असणाऱ्या खडकनाथ कोंबड्याचा आहारात समावेश करावा.’’ असे कृषी केंद्राने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मध्य प्रदेशमधील आदिवासी भागातून या कडकनाथ कोंबड्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. या कोंबड्याच्या मांसाची चारशे ते पाचशे रुपये किलोने विक्री होते. याच्या तुलनेत इतर चिकनला शंभर ते दिडशे रुपये प्रति किलोला भाव आहे. हा एक जंगली कोंबडा असून, तो पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात वाढलेला असतो. त्यामुळे तो इतर कोंबड्यांच्या तुलनेत जास्त आक्रमक असतो.

Post a Comment