बंगळूर :
कर्नाटकातील तुमकूर येथील लिंगायत समाजाच्या सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री शिवकुमार स्वामी यांचे वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि भाजपचे नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली आहे.
कर्नाटकातील तुमकूर येथील लिंगायत समाजाच्या सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री शिवकुमार स्वामी यांचे वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि भाजपचे नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली आहे.
श्री शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी सकाळी ११.४४ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले.
शिवकुमार स्वामी यांना अध्यात्मातील 'चालता बोलता देव' म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून शिवकुमार स्वामी आजारी होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोश्वासवर ठेवले होते. मात्र, अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसांची सुटी जाहीर केली आहे.
कोण आहेत शिवकुमार स्वामी...
शिवकुमार स्वामी हे लिंगायत समाजाच्या सिद्धगंगा मठाचे अधिपती आहेत. सिद्धगंगा मठ समाजाचा मुख्य मठ असून तो बंगळूरपासून ८० किलोमीटर अंतरावर तुमकूर येथे आहे. सिद्धगंगा मठाचा कर्नाटकात मोठा प्रभाव आहे. शिवकुमार स्वामींचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर येथील वीरपूरा येथे झाला. धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पद्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती.
सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतीच स्वामींना भारतरत्न देण्याची शिफारस केली आहे.
राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून दु:ख व्यक्त
श्री शिवकुमार स्वामींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शिवकुमार स्वामींचे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे, असे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे.

Post a Comment