पुणे :
वेश्या व्यवसाय चालत असलेल्या बुधवार पेठ परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून नाकेबंदी केली जात आहे. परिणामी येथील वेश्या व्यवसायात ८० ते ९० टक्क्याची घट झाली आहे. त्यातच कोणत्याही कामासाठी रात्री घराबाहेर पडताच पोलिस दंडाची पावती हातावर टेकवतात. नाकेबंदीमुळे ’धंदा’ होत नसताना दंडाचे पैसे भरायचे कुठून आणि मुली संभाळायच्या कशा, असे अनेक प्रश्न येथील कुंठणखाना मालकिनींसमोर उभे ठाकले आहेत.
वेश्या व्यवसाय चालत असलेल्या बुधवार पेठ परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून नाकेबंदी केली जात आहे. परिणामी येथील वेश्या व्यवसायात ८० ते ९० टक्क्याची घट झाली आहे. त्यातच कोणत्याही कामासाठी रात्री घराबाहेर पडताच पोलिस दंडाची पावती हातावर टेकवतात. नाकेबंदीमुळे ’धंदा’ होत नसताना दंडाचे पैसे भरायचे कुठून आणि मुली संभाळायच्या कशा, असे अनेक प्रश्न येथील कुंठणखाना मालकिनींसमोर उभे ठाकले आहेत.
बाळाजी विश्वनाथ पेशवा यांनी पुण्यात अनेक पेठा वसवल्या, त्यापैकी एक म्हणजे बुधवार पेठ. त्यानंतर ब्रिटिशांनी बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाची निर्मिती केली. ही वस्ती आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी वेश्या वस्ती म्हणून ओळखली जाते. सध्या या परिसरात नेपाळ, पश्चिम बंगाल आणि कर्नाकट राज्यातील मुलींची मोठी संख्या असून सध्या या ठिकाणी ४४० पेक्षा जास्त कुंठणखाने आणि ७ हजाराहून जास्त वेश्या आहेत.
वस्तीच्या आसपास शहरातील महत्त्वाची बाजारपेठे असल्याने दिवसभर विविध वस्तू खरेदी करणार्यांची मोठी गर्दी असते. जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतशे येथील रस्ते वेश्याबाजाराने गजबजुन जातात. भडक मेकप, ग्राहकांना आकर्षित करणारे कपडे परिधान करून येथील वेश्या रस्त्यावर, दारात, आणि गॅलरीत उभ्या असतात. शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असल्याने जिल्हा आणि राज्याबाहेरून येणार्या युवकांची संख्या मोठी आहे. हाच वर्ग या परिसरात येत असल्याने रात्रभर येथील व्यवसाय तेजीत चालतो. या पार्श्वभूमीवर कुंठणखान्याच्या मालकीनी नवनवीन मुली इतर शहरातून व्यवसायासाठी आणतात.
मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पोलिसांकडून रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत वेश्या वस्तीतील लहान मोठे रस्ते बंद केले जात आहेत. या कालावधीत रस्त्यावर येणार्या महिला व मुलींना पोलिसांकडून मुंबई पोलिस कायदा ११० नुसार सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे व कलम ११७ नुसार अडीचशे रुपये दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. तर या ठिकाणी रस्त्यावर येणार्या पुरुषांना आणि मुलांना कलम ११२ नुसार सार्वजनिक ठिकाणी असभ्य भाषा वापरून शांतता भंग केल्या प्रकरणी पावत्या दिल्या जात आहेत. ही कारवाई सुरू केल्यापासून या परिसरातील ८० ते ९० टक्के व्यवसाय कमी झाल्याने बाहेरून आणलेल्या मुली संभाळायच्या कशा? घराचे भाडे, खाणे भागवायचे कसे? असे अनेक प्रश्न उभे ठाकल्याचे कुंठणखान्याच्या मालकीनीं सांगितले.
रिक्षात जाताना थांबवून फाडली पावती
चांदणी चौकातील एका इमारतीमधील रिहाना (नाव बदलले आहे) ही महिला गॅसचे पासबुक आणण्यासाठी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२० वा रिक्षातून जात होती. काही अंतरावर पोलिसांनी रिक्षा आडवून रिहानाला पावती दिली. जाब विचारल्यानंतर बाहेर कोणालातरी भेटायला जात असल्याचा आरोप करत पोलिसांनी धमकावल्याचेही रिहानाने सांगितले.
व्यवसाय नसल्याने दंड भरायचा कसा ?
लहान सहान कामांसाठी घराच्या बाहेर पडल्याबरोबर पोलिसांकडून पावत्या दिल्या जातात. अनेकवेळा पोलिस तीसर्या-चौथ्या मजल्यावर घरात येऊन बळजबरीने पावत्या देतात. दंडाची रक्कम न्यायलयात भरावी लागते, त्यामुळे दिवस जातो. मी व्यवसाय करत नही, व्यवसाय करणार्या मुलींचा स्वयंपाक व इतर कामे करते, मात्र मी बाहेर गेल्याबरोबर पोलिसांनी मला पावती दिली, अशी माहिती येथील सिमा (नाव बदलले आहे) यांनी दिली. दिवसा एक -दोन ग्राहक येतात, जो काय व्यवसाय होतो, रात्रीच्या वेळीच चांगला व्यवसाय होतो. मात्र, पोलिस कारवाईमुळे दिवसाला १५-१६ हजार रुपये होणारा व्यवसाय हजाराच्या आत आला आहे. त्यात दंडाची रक्कम कोठून भरायची. त्यामुळे मालकीनीने काही मुलींना दुसऱीकडे इतर शहरात पाठवले आहे. या कारवाईमुळे येथील वेश्या व्यवयास अडचणीत अल्याचेही सिमा यांनी सांगितले.
पूर्वी पैसे घेऊन सोडत, आत्ता मात्र पावतीच फाडतात
यापूर्वी परिसरातील रिक्षांमध्ये पोलिस साध्या वेशात दबा धरून बसत असत. एखादा ग्राहक इमारतीच्या बाहेर पडताच पोलिस पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पोलिस चौकीच्या दिशेने नेत असत. रस्त्यात त्याच्याकडून कोणाकडे गेला होता, अशी विचारणा करून पैसे घेऊन सोडून देत असत. त्यानंतर संबंधीत मुलीकडे येऊन मुलगा तक्रार करत असल्याचे सांगून तिच्याकडूनही पैसे उकळत. मात्र नाकेबंदीची कारवाई सुरू झाल्यापासून पोलिस पावतीशिवाय काहीच बोलत नाहीत. पावती देऊन न्यायालयात दंड भरण्यास सांगितले जाते. न्यायालयात गेल्यावर रांगेत उभे राहून अडीचशे दंड भरावा लागतो. त्यामुळे एक दिवस पूर्ण वाया जातो, अशीही माहिती येथील महिला व मुलींनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना दिली.
गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई ; पोलिसांचे स्पष्टीकरण
या परिसरात जिल्हा आणि राज्याबाहेरील तरूण मुले जास्त प्रमाणात येतात. यामध्ये काही गुन्हेगारही असतात. लहान सहान गोष्टींवरून या ठिकाणी वारंवार हाणामारी व वाद होतात. येथील घटना पोलिसांपर्यंत येऊ दिल्या जात नाहीत. गुन्हे करणारे पुन्हा मुळ गावी पळून जातात, त्यामुळे त्यांचा शोध लागत नाही. त्यातच बांगला देशावरून मुली आणल्या जातात. एकंदरीत या परिसरातून आलेल्या विविध तक्रारी आणि वरीष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेश यानुसार नाकेबंदीची कारवाई केली जात आहे. ही कारवाई कोणालाही त्रास देण्यासाठी नाही तर या परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी केली जात आहे, असे स्पष्टीकरण फरासखाना पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment