0
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत युतीबाबत वक्तव्ये केली जात आहेत.

मुंबई- शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेनेच्या अनेक खासदारांची युती व्हावी अशी इच्छा असून भाजपही युतीसाठी आग्रही आहे. या स्थितीत भाजपकडून युतीचा प्रस्ताव आला तर त्याबाबत महाराष्ट्रातील नेते वा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच चर्चा करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिव्य मराठीला दिली.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत युतीबाबत वक्तव्ये केली जात आहेत. युती झाली नाही तर हिंदूंच्या मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच होईल, असे भाजपकडून सांगितले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर युती आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत भाजपचे सर्व नेते अगदी खासदारही व्यक्त करत आहेत. शिवसेनेकडून मात्र याला अजून प्रतिसाद मिळालेला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टपणे युती होणारच नाही, असे आजपर्यंत सांगितलेले नाही. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत वगळता एकाही नेत्याने युती होणारच नाही, असेही म्हटलेले नाही.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. भाजप आणि शिवसेना युती करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. युतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी त्याची माहिती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना दिली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव जरी निर्माण झाला असला तरी दोन्ही पक्षांची युती होणार असल्याची टीका विरोध पक्ष करत आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे देखील काही जागांवरून घोडे अडलेलेच आहे. दोन्ही पक्षांतील हा तिढा अजूनतरी सुटला नाही. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातही आघाडीबाबत चर्चा झाली आहे. आता काही जागांवर एकमत झाल्यानंतर राज्यात आघाडीबाबातची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे.

प्रस्तावाची वाट बघत आहे शिवसेना 
शिवसेनेतील सूत्रांनी युतीबाबत बोलताना सांगितले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली की नाही, दोघांचे फोनवरून बोलणे झाले की नाही त्याबाबत आम्हाला काही ठाऊक नाही. त्याबाबत उद्धव ठाकरेच सांगू शकतील. मात्र, जर भाजपकडून युतीचा प्रस्ताव आला तर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही नेत्याशी याबाबत चर्चा करण्याऐवजी थेट नरेंद्र मोदी यांच्याशीच चर्चा करण्याचे ठरवले आहे. या चर्चेच्या वेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहू शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले होते की, आम्ही शिवसेनेला योग्य प्रस्ताव देऊ. एकूणच शिवसेना भाजपकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहत आहे.alliance discussion with Prime Minister Modi says  Uddhav Thackeray

Post a Comment

 
Top