0
गडहिंग्लज : 

दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सत्कार प्रसंगी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव खा. शरद पवार यांनी केला. समाजाला दिशा आणि दृष्टी देण्याचे कार्य पुढारीने केले. याच भूमिकेतून पुढारीकार ग. गो. जाधव यांचे कार्य आणि परंपरेचा वसा पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव पुढे चालवत आहेत. डॉ. जाधव यांचे आजपर्यंत अनेक सत्कार झाले असतील. मात्र हा सत्कार त्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असा आहे. त्यातच या भागातील नेतृत्वाकडे पाहता त्यामध्ये महिला अग्रगण्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा सत्कार म्हणजे सावित्रीच्या लेकींनी केलेला सत्कार आहे. त्याचा अभिमान पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नक्कीच बाळगावा असाच आहे, अशा आशयाचे उद्गार यावेळी खा. पवार यांनी काढले.

समाजहिताचे कोणतेही कार्य असले तर पुढारीने त्यामध्ये हिरीरीने भूमिका घेऊन मत मांडले आहे. सीमेच्या रक्षणावरील सैनिकांचा प्रश्न असो की, शहरातील एखादी जटील समस्या, पुढारीने नेहमीच त्याची तड कशी लागेल याचाच विचार मांडला. एवढेच नाही तर सियाचिनसारख्या जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या युद्धभूमीवर रुग्णालय उभारणीचे कार्य पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. आपले आजोळ नूल येथे त्यांनी इंदिरा देवी जाधव आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स उच्चमाध्यमिक महाविद्यालयाची इमारत बांधून उच्चशिक्षणाची गंगा आणली. डॉ. जाधव यांच्या अशा प्रकारच्या कार्याला तोड नाही असेही पवार यावेळी म्हणाले. याच परंपरेचा सन्मान करण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहल्याचे पवार म्हणाले.

वृत्तपत्र चालवणे ही छोटी गोष्ट नाही. तसेच एखादे वृत्तपत्र सलग ८० वर्षे अविरतपणे सुरू ठेवणे ही तर त्याहून मोठी गोष्ट आहे. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढारीकार ग.गो. जाधव यांचा वारसा घेऊन हे कार्य अवरतपणे सुरू ठेवले आहे. यातूनच त्यांची महानता दिसून येते अशा आशयाचे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले. पुढील पिढीही हेच कार्य नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने पुढे नेत आहे. याच परंपरेचा सन्मान करणे महत्वाचे ठरते असे पवार यावेळी म्हणाले.

या भागाच्या आमदार या महिला आहेत. नगराध्यक्षाही महिला आहेत तसेच पंचायत समिती सभापतीही महिलाच आहेत. त्यामुळे महिलांच्याकडील ५० टक्के नेतृत्वाची वास्तवता या ठिकाणी दिसून येते. त्याचवेळी येथील नेतृत्वाच्या पोटी प्रामुख्याने कन्यांचाच जन्म होतो याचा आवर्जून उल्लेख पवार यांनी केला. तसेच या सावित्रीच्या लेकींच्या हातून मोठे कार्य उभारले जाईल असा विश्वासही खा. पवार यांनी व्यक्त केला.

येथील नगरपरिषदेतर्फे दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिल्पाकृती, शाल, श्रीफळ, मानपत्र देण्यात आले. गडहिंग्लज नगरपरिषद तसेच आजरा चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. 

Post a comment

 
Top