0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला सर्वात मोठी मदत कुणाची झाली असेल तर ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाळासाहेबांवरील पुस्तकाची! ‘ बाळ केशव ठाकरे ः अ फोटोबायोग्राफी’ हे पुस्तक राज यांनी 2005 मध्ये प्रकाशित केले होते. या पुस्तकात बाळासाहेबांची 800 हून अधिक छायाचित्रे आहेत. वेगवेगळ्या प्रसंगातील आणि वेगवेगळ्या काळातील या छायाचित्रांचा मला बाळासाहेब साकारताना खूप उपयोग झाला. त्यांचे हावभाव, शैली उचलण्यासाठी हे पुस्तक वरदानच ठरले, असे नवाजुद्दीन म्हणाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला येत आहे. यात बाळासाहेबांची भूमिका साकारलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने बुधवारी 'पुढारी'शी संवाद साधला.
प्रश्‍न :  तुम्हीच ‘ठाकरे’ होऊ शकता, हे कसे ठरले?
नवाजुद्दीन : फक्त दोन मिनिटांत हा निर्णय झाला. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी माझी बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी निवड केली. सुरुवातीला मलाही यावर विश्‍वास बसला नाही. पण मी तो त्यावेळी व्यक्त केला नाही. घरी गेल्यानंतर मी घरच्यांना ही गोष्ट सांगितली. त्यावेळी त्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. तो दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. बाळासाहेबांसारख्या महान नेत्याची भूमिका करायला मिळणे हेच मुळी कुणाचेही स्वप्न असू शकते. ते माझ्या वाट्याला आले.

प्रश्‍न  : भूमिकेची तयारी हे मोठे आव्हानच होते. ती कशी 
नवाजुद्दीन :  बाळासाहेबांसारख्या नेत्याला पडद्यावर साकारणे म्हणजे मोठे दिव्यच होते. बाळासाहेब म्हणजे एक विद्यापीठच होते. राजकारणी, समाजकारणी, कलाकार, संवेदनशील माणूस ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्यात ठासून भरलेली होती. त्यामुळे त्यांच्या जीवनावरचा प्रत्येक प्रसंग साकारणे तसे अवघड होते.  चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी पाच ते सहा महिने मला अभ्यास करण्यास मिळाले. यादरम्यान बाळासाहेबांच्या जवळपास सर्वच चित्रफिती पाहिल्या. संजय राऊत यांच्याशी सतत संपर्क होताच. त्यांनी बाळासाहेबांच्या स्वभावातले अनेक बारकावे सांगितले.  ते हसायचे कसे?, विनोद करताना त्यांची देहबाली कशी असायची?, एकटे असताना कसे विचार करायचे?, भाषण देताना त्यांचा आवेश कसा असायचा? या सर्व गोष्टी सातत्याने अभ्यासल्या.

प्रश्‍न :  तू इन्स्टाग्रामवर ‘ठाकरे’ ची पोस्ट टाकताच त्यावर टोकाच्याही प्रतिक्रिया आल्या. ही भूमिका करू नकोस म्हणून कुणाचा दबाव आला का?
नवाजुद्दीन : दबाव येण्याचा प्रश्‍नच नाही. मी आणि माझे विचार स्वतंत्र असल्याने मी कोणतीही भूमिका साकारू शकतो. कुणी दबाव आणला असता तरी मी त्याला जुमानले नसते.

प्रश्‍न : ‘ठाकरे’ होण्यासाठी वजन कमी केले का?
नवाजुद्दीन : मुळात माझी शरीरयष्टी बाळासाहेबांशी मिळती-जुळती असल्याने तो प्रश्‍न आलाच नाही. निर्माते आणि दिग्दर्शकांनी तू आणि तुझी शरीरयष्टी अगदी बाळासाहेबांशी तंतोतंत जुळते असे सांगितल्याने मी वजन वगैरे कमी करायच्या फंदात पडलो नाही. 

प्रश्‍न :  ‘ठाकरे’ शिवाय आणखी काय  सुरू आहे?
नवाजुद्दीन : फोटोग्राफ या चित्रपटाकडून मला बर्‍याच अपेक्षा आहेत. बर्लिन महोत्सवात तो दाखवला जाणार आहे. याशिवाय मोतीचूर या चित्रपटाबद्दलही मी आशा बाळगून आहे. 

प्रश्‍न : मनावर ठसलेली आतापर्यंतची भूमिका कुठली?
नवाजुद्दीन : ‘मांझी : द माऊंटन मॅन’ हा माझा ड्रीम रोल होता. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. प्रेक्षकांनी या भूमिकेची खूपच तारीफ केली. घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. यापेक्षा चांगल्या भूमिका मिळतीलही पण या चित्रपटाचे स्थान मात्र माझ्या मनात अढळ राहील. नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मंटो’ला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये स्वीकारले नाही. हा चित्रपट तिकीट बारीवर साफ आपटला. पण त्या चित्रपटासाठी ऑस्ट्रेलियामध्ये एशिया पॅसिफिकचा बहुमान मिळाला. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे कौतुक झाले. नेटफ्लिक्सवर आल्यावर मात्र हा चित्रपट जगभरात पोहोचला. 

प्रश्‍न : मध्यंतरीच्या काळात तुझे अनेक चित्रपट आले आणि गेले पण चालले नाहीत.
नवाजुद्दीन : बाबुमोशाय बंदुकवाला, रामन राघव या चित्रपटांकडून मला फार अपेक्षा होत्या. पण हे चित्रपट चालले नाहीत. बहुदा भारतीय प्रेक्षकाला अतिहिंसाचार पसंत नसावा. म्हणूनच त्यांनी या चित्रपटांकडे पाठ फिरवली असावी. 

प्रश्‍न : हॉलिवूडमधून ऑफर आल्या का?
नवाजुद्दीन :  सध्या नेटफ्लिक्सच्या माध्यमातून मी जगभरात पोहोचलो आहे. हॉलिवूडच्या तुलनेत नेटफ्लिक्सचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे हॉलिवूडमध्ये काम करावे असे वाटलेच नाही. अर्थात काही संधी आल्या होत्या. पण या दरम्यान माझ्याकडे देशातच इतके काम होते की ते सोडावेसे वाटले  नाही. नेटफ्लिक्सवर चाललेली सॅक्रेड गेम्स ही मालिका तुफान लोकप्रिय ठरली. अशा मालिकांमुळे मी सतत कामात राहिलो.

Post a Comment

 
Top