0
मोहोळ : 

जात वैधता प्रमाणात्र सादर न केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील गावातील १७२ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये मोहोळ तहसील प्रशासनाने संबंधीत ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावून १९ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याच्या सुचना दिल्या आहेत.

मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनु.जाती अनु.जमाती स्त्री/पुरुष, ओबीस स्त्री/पुरुष उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक प्रशासनाकडे जमा बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमधील तब्बल १७२ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाला सादर केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सदर सदस्यांचे सदस्यत्व रद्द का करु नये म्हणून १९ जानेवारी रोजी दुपारी १. वाजता सुनावणी घेणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या मार्फत संबंधीत ग्रामपंचायत सदस्यांना (ग्रा.पं. अधिनियम कलम १०/१/अ अन्वये) नोटिसा बजावल्या आहेत.

 तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या पेनूर गावातील ५ ग्रामपंचायत सदस्यांना याबाबतच्या नोटीसची बजावणी झाली आहे. सविता माळी, रमाबाई आवचारे, नागनाथ अनुसे, रशिद मुजावर आणि अंजली गवळी अशी त्यांची नावे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशामुळे या सदस्यांसह तालुक्यातील अन्य सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार त्यांच्यावर लटकली आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


Post a Comment

 
Top