0
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आलेली असताना देशातील चार लाख तरुणांना रेल्वेमध्ये नोकऱ्या देण्याचे गाजर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दाखवले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांसाठी 10 टक्के आरक्षण सरकारने ठेवलेले आहे. हे आरक्षणही या भरतीसाठी लागू केल्याचे गाजरही पीयूष गोयल यांनी दाखवले आहे. यामुळे आर्थिक दुर्बलांना 23 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावाही करण्यात येत आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गोयल पुढे म्हणाले, रेल्वेत 2.25 लाख ते 2.50 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. रेल्वेतील 1.50 लाख रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे रेल्वे एकप्रकारे 4 लाख नोकऱ्या देणार आहे. दीड लाख तरुणांना नोकऱ्या देण्याची प्रक्रिया फार पुढे गेली आहे. 2 ते अडीच महिन्यांत ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला. एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी आगाऊ भरती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या रेल्वे नोकरभरतीची जाहिरात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड फेब्रुवारीत प्रसिद्ध करणार आहे आणि दुसरी जाहिरात मे महिन्यात प्रसिद्धीस दिली जाईल, अशी माहिती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

ही संपूर्ण भरतीची प्रक्रिया ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण करण्यात येईल. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय यासह गरीब सवर्णांनाही या भरतीचा फायदा होईल, असे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दीड लाख नोकऱ्या, अडीच कोटी अर्जदार
ग्रुप सी, ग्रुप डीमधील दीड लाखाहून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे गतवर्षी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीवरून सुमारे 2.5 कोटी तरुणांनी भरतीसाठी अर्ज केले. या दोन्ही गटांतील भरतीची ही प्रक्रिया ऑगस्ट 2019 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top