आडी (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील जवान रोहित सुनील देवर्डे यांचा रविवारी सकाळी सिक्कीम येथील घनकोट येथे हिमकडा कोसळून अपघाती मृत्यू झाला होता. चार दिवसानंतर रोहित याचे पार्थिव सिक्कीमहून बुधवारी रात्री पुणे येथे आणण्यात आले होते. यानंतर गुरूवारी पहाटे पुण्यात लष्करी मानवंदना दिल्यानंतर खास रुग्णवाहिकेने रोहितचे पार्थिव त्याच्या जन्मगावी आडी येथे सकाळी साडे आठ वाजता आणण्यात आले. तत्पूर्वी महामार्गावरील कोगनोळी टोलनाका येथेही पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. गावात पार्थिव दाखल झाल्यानंतर गावातील माळभाग येथे असलेल्या त्याच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी रोहित यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
रोहितच्या अंत्यदर्शनानंतर गावातून प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेत सहभाग दर्शवून जवान रोहित अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. गेल्या चार दिवसांपासून रोहितच्या पार्थिवाची प्रतीक्षा कुटुंबियांना व परिसरातील नातलगांबरोबरच नागरिकांना लागून होती. गुरूवारी पार्थिव दाखल होणार असल्याचे समजल्याने अंत्ययात्रेसाठी परिसरातील नागरिकांना मोठी गर्दी केली होती.
जवान रोहित यांचे पार्थिव गावात दाखल झाल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून रांगोळी, फुलांचे सडे टाकण्यात आले होते. सुमारे तीन तासाच्या अंत्ययात्रेनंतर रोहित याचे पार्थिव अंत्यविधीसाठी आडी मल्लया डोंगर पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात अंत्यविधी होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. आर. बोमणहळ्ळी, तहसीलदार महादेव बन्सी, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. सुधीरकुमार रेड्डी, उप अधीक्षक जी. के. मिथुनकुमार, सीपीआय संतोश सत्यनायक, फौजदार बी. एस. तळवार यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, जि. प. अध्यक्ष यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment