0
पालघर : मोबाइलशी का खेळतेस म्हणत पित्याने मुलीस पेटवले

पुणे/ ठाणे- माेबाइलचे वाढते वेड आणि त्यांचे होणारे सामाजिक दुष्परिणाम आता गंभीर रूप धारण करत आहेत. याची प्रचिती देणाऱ्या दोन घटना दोन दिवसांत राज्यात घडल्या. यात पहिली सुन्न करणारी घटना पुण्यात घडली. 'अभ्यास सोडून मोबाइलवर खेळू नकोस' म्हणून आई रागावल्याने संतापलेल्या एका १३ वर्षाच्या मुलाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. तर, दुसऱ्या एका घटनेत पालघरमध्ये सतत मोबाइलवर चॅटिंग करणाऱ्या स्वत:च्या मुलीस बापाने पेटवून दिले. मुलगी ७० टक्के भाजली आहे.

अवघ्या तेरा वर्षांच्या दर्शनने मोबाइल बाजूला ठेवला, पण...
पुणे : अडनिड्या वयातील मुलांशी नेमके कसे वागावे, हा प्रश्न पालकांना पडावा, असा प्रकार पुण्यात घडला. 'अभ्यास सोडून मोबाइलवर खेळू नकोस' असे आईने सुनावले आणि अवघ्या तेरा वर्षांच्या दर्शन भुतडा या शाळकरी मुलाने आईवर रागावून थेट गळफास घेऊन आत्महत्या केली.
धनकवडी येथील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या मनीष भुतडा यांच्या घरी मुलगा दर्शन अभ्यास न करता मोबाइलवर सतत खेळत असल्याचे दिसताच आईने रागावून अभ्यासाला बस, असे सुनावले. आई रागावल्याचे पाहून दर्शनने मोबाइल ठेवून दिला आणि खोलीत निघून गेला. बराच वेळ दर्शनची चाहूल न लागल्याने आईने खोलीत डोकावले तेव्हा तिला धक्काच बसला. कारण दर्शनने खोलीत गळफास घेतला होता. आईने त्याला तत्काळ रुग्णालयात हलवले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सहकारनगर पोलिस पुढील तपास करत आहेत. दर्शन इयत्ता आठवीत शिकत होता.

बापाने मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले
सतत मोबाइल वापरत असल्याने बापाने मुलीला रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना पालघर येथे उघडकीस आली. ७० टक्के भाजलेल्या मुलीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोहंमद मन्सुरी हा कुटुंबासोबत पालघर येथे वास्तव्यास आहे. त्याची १६ वर्षीय मुलगी दिवसभर मोबाइलवर चॅटिंग करायची किंवा चित्रपट पहायची. याच कारणामुळे मोहंमद याचा मुलीशी मंगळवारी वाद झाला. या संतापात त्याने मुलीला राॅकेल टाकून पेटवून दिले. शेजाऱ्यांनी मुलीला जेजे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी मुलीचा बाप मोहंमद मन्सुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

पूर्वीचा संयम, विवेक आता दिसत नाही :
पूर्वी आपण मोठे झालो, प्रगल्भ झालो, आपल्याला समज आली, हे दर्शवणारी मनगटी घड्याळाची जागा आज मोबाइलने घेतली आहे. पण पूर्वीच्या सामाजिक-सांस्कृतिक- कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर असणारा संयम, विवेक आज दिसत नसल्याने अशा दुर्दैवी घटना समोर येत आहेत, असे माध्यमतज्ज्ञ विश्राम ढोले यांनी सांगितले.
Shocking news in Palghar

Post a Comment

 
Top