सिंगापूर भेटीत अमेरिकेने दिलेले आपले आश्वासन पूर्ण केले नाही. उलट उत्तर कोरियालाच दाबण्याचा प्रयत्न सुरू केला.
- प्योंगयंग - उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांनी नवीन वर्षाच्या भाषणात पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्यांचा गर्भित इशारा दिला आहे. गतवर्षी 12 जून रोजी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले उत्तर कोरियन लीडर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्या भेटीत ठरल्याप्रमाणे उत्तर कोरियाने आपले क्षेपणास्त्र चाचणी स्थळ नष्ट केले. परंतु, अमेरिकेने या देशावरील निर्बंध हटवण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. उलट ट्रम्प उत्तर कोरियालाच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अमेरिकेने आपल्या देशावरील निर्बंध हटवले नाही तर पुन्हा जुना मार्ग अवलंबावा लागेल असे किम जोंग उन यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने आपले आश्वासन पाळायला हवे -किम
उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवरून देशाला संबोधित करताना किम म्हणाले, अमेरिकेने जगासमोर येऊन आपले आश्वासन (उत्तर कोरियावरून निर्बंध हटवण्याचे) पूर्ण करावे. ते आमच्यावर असेच दबाव टाकत असतील तर आम्हाला जुना मार्ग स्वीकारावा लागेल. देशहित आणि स्वायत्ततेसाठी हेच आवश्यक आहे.
पुन्हा ट्रम्प यांची भेट घेण्यास इच्छुक
किम यांनी सांगितल्याप्रमाणे, ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पुन्हा भेट घेण्यासाठी तयार आहेत. आणखी एका भेटीमुळे देशहित जोपासले जात असतील तर भविष्याच्या रणनिती आखण्यासाठी अख्खे जग या भेटीचे स्वागत करेल. यासोबतच, अमेरिकेने दक्षिण कोरियासोबतचे भडकाऊ युद्धसराव बंद करून तणाव कमी करावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. दक्षिण कोरियामध्ये अजुनही अमेरिकेचे 28500 सैनिक आहेत. तसेच दक्षिण कोरियाच्या एका हाकेवर अमेरिका उत्तर कोरियाविरुद्ध केवळ युद्धच नव्हे, तर अण्वस्त्र हल्ले करण्यास सुद्धा 24 तास सज्ज आहे.
Post a Comment