0
चिपळूण - तालुक्‍यातील दाट जंगल, थंड हवा, वनौषधी, वन्यजीवन अशा अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडतात. व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग, रॉक क्‍लायंबिंग अशा साहसी पर्यटनाचा मनमुराद आनंद येथे घेता येतो.
चित्तवेधक व थरारक अनुभव देणारे कडे व सुळके सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहेत. तेथे पदभ्रमंतीची संधी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणारा वासोटा किल्ला आणि कोकण कडा प्रसिद्ध आहे. तिथे तिवरे व चोरवणे मार्गे जाता येते. चोरवणे मार्गे नागेश्‍वरला जाता येते. निसर्गाचा अनुभव देणाऱ्या पायवाटा या मार्गावर आहेत. तेथेच नागेश्‍वरचा सुळका आहे.

सुळक्‍याच्या पोटामध्ये असलेल्या गुहेत स्वयंभू शंकराची शिवपिंड आहे. शंकराच्या पिंडीवर बारमाही जलाभिषेक होत असतो. तो बघण्यासारखा आहे. चोरवणे गावात ग्रामीण पर्यटनाच्या अंतर्गत राहण्याची व्यवस्थाही आहे. टेरव येथील भवनी वाघजाई मंदिर, दादर कळकवणेची रामवरदायिनी, चारगाव खांदाटपाली येथील मल्लिकार्जुन आणि शिरवली येथील सुकाई देवीची देवराई आहे.

तेथील घनदाट जंगलात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. तेथे पदभ्रमंती करता येते. कुंभार्ली घाटात निसर्गासमोर नतमस्तक झालेला माणूस, अशा आकारात तेथे एक दगड आहे. तेथे पोफळीतून जाता येते. कोळकेवाडी येथे दुर्ग किल्ला आहे. तेथे प्राचीन शिल्प, गुहा, दुमजली लेणी आहेत. त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत.

Post a Comment

 
Top