0
 वाहतूक खर्चही देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे

तिसगाव : मढी येथील श्रीधर सुभाना पोळ यांनी अहमदनगर येथे बाजार समितीत ८ गोणी कांदा (४३० किलो) विक्रीस आणलेल्या शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ८ रुपये मिळाले. घरी येण्यासाठी पोळ यांनी १०० रुपये चालकाकडून उसने घेतले.


मढी येथील श्रीधर पोळ हे शेतकरी दरवर्षी कांद्याचे उत्पादन घेतात. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने कांद्याचे पीक टँकरचे विकत पाणी घेत कसेबसे आणले. यासाठी हजारो रुपये कर्ज घेऊन खर्च केला. दोन महिने शेतात दरवाढीच्या प्रतीक्षेत कांदा ठेवला. साठवलेल्या कांद्याला थंडीमुळे मोड फुटू लागल्यामुळे त्यातील ८ गोणी कांदा मढी येथून ५० किमी अंतरावर असलेल्या नगर बाजार समितीत विक्रीस आणला होता. त्यांच्या ५ कांदा गोण्यांचे वजन २७१ किलोे, त्याचे पैसे ४७४ रु, तर ३ गोण्यांचे वजन १५९ किलो, पैसे १९८.७५ पैसे झाले. एकूण ८ गोणी वजन ४३० किलो, ६७३ रुपये रक्कम झाली. मोटार भाडे, बारदाणा, तोलाई, हमाली, मापाई, भराई असा सर्व खर्च ६६५ रुपये आला. हा खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात अवघे ८ रुपये पडले. जास्त भाव मिळेल या आशेने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याणेे दर (पट्टी) पाहून श्रीधर पोळ यांच्या डोळ्यात पाणी आले. ८ गोणी कांद्याचे केवळ ८ रुपयेच मिळाले. गाडीचालक फिरोज शेख यांच्याकडून खर्चाला पैसे उसने घेण्याची वेळ पोळ यांच्यावर आली.


भाव मिळेल या आशेने आम्ही कांदा विक्रीसाठी घेऊन आलो. उत्पादन खर्चही निघाला नाही. दुष्काळाच्या झळा सोसत टँकरने पाणी टाकत जगवलेल्या कांद्याला मातीमोल भावात विकला असल्याचे पोळ यांनी सांगितले. दुष्काळात विकतचे पाणी देऊन पिकवलेल्या कांद्याला असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून शेतात लावलेल्या कांद्याला पाणी नाही, तर शेतात साठवलेल्या कांद्याला भाव नाही. भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे.शेतकऱ्याला शेतीमाल बाजारात पाठवण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. Farmer got only 8 rupees profit from 430 kg onion

Post a Comment

 
Top