रत्नागिरी :
माजी खासदार व स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. शिवसैनिकांचे जसे बाळासाहेबांवर प्रेम आहे, तसेच आमचेही आहे आणि नारायण राणे हेही आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टीका केल्यास आम्हालाही ठाकरे घराण्याची गुपिते जाहीर सभांमधून उघड करावी लागतील, असा इशारा नीलेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.ते पुढे म्हणाले, राणे हे बॅकफूटवर खेळत नाहीत, नेहमीच फ्रंटफूटवर खेळतात. आ. उदय सामंत व त्यांचे कुटुंब आमचे दुश्मन नाही; पण भ्रष्टाचार बाहेर पडला पाहिजे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सहन होत नाही, अशी परिस्थिती झाल्याने राणेंना कुठे अडकवता येईल, याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या औकातीत राहावे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील नागरिकांच्या किती समस्या खासदारांनी सोडवल्या? मिरकरवाडा असो की, मच्छीमार, व्यापारी, महामार्गाचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून ही मंडळी आमच्याकडे येत आहेत. शिवसेनेने कोकणला बरबाद केल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व सत्ता शिवसेनेची असूनही कॅबिनेटमध्ये रत्नागिरीचा साधा उल्लेख येत नाही. दोन्ही जिल्हा परिषदांना शासनाकडून निधी नसल्याने खड्ड्यात घालण्याचे काम शिवसेनेने केले. यांचेच ठेकेदार, वाळू, चिरे, मटकेवालेही यांचेच, मग विकास होणार कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांनी कोणत्या विश्वासावर नगराध्यक्षांना निवडून दिले. त्याचा तिढा अजून सुटलेला नाही, असे नीलेश राणे यांनी सांगितले.
आम्ही राणेंवर टीका करणार नाही, असे सांगतानाच आ. सामंत यांचे 75 टक्के भाषण हे राणेंवर होते, तर खासदारांनी विकासावर बोलण्याऐवजी शंभर टक्के भाषण हे राणेंवर आरोप करण्यातच केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment