0
कोल्हापूर :

तीन, चार दिवस झाले. पार आठवडा पालटला. महिना सरला... बराच काळ होऊनही ‘रक्षा, अस्थी’ साठी पुढे कोणीच येईना... पोलिस दल, ग्रामस्थांची चिंता वाढली. मृत व्यक्‍ती कोण, कुठली, कशामुळे मृत्यू ओढविला. निर्जन, जंगल काठावर निर्जन ठिकाणच्या स्मशानभूमीत अत्यंविधीचा उद्देश काय? घातपात करून पुरावा दडपण्याचा तरी संशयिताचा प्रयत्न नसावा? पोलिस दलात संशय कल्लोळ माजले...


पन्हाळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ‘डीएनए’चा निर्णय झाला... डॉक्टरांना बोलावणं धाडलं... पण अंधार्‍या रात्रीत स्मशानभूमीत येण्यास नकारघंटा मिळाली... बेवारस अस्थींचं करायचं काय? संशयितांनी रात्रीत अस्थी पळवून नेल्या तर? तपास यंत्रणेसमोरचा प्रश्‍न... पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील, पोलिस निरीक्षक अंबरूषी फडतरेंसह पथकातील पोलिसांची तारांबळ उडाली... रक्‍त गोठविणार्‍या थंडीत अन ्काळोख्या रात्रीसह तब्बल 18 तास स्मशानभूमीला पहारा देण्याचा थरार पन्हाळा पोलिसांना अनुभवावा लागला... घडलं ते असं...पन्हाळा येथील व्यावसायिक अमित कवडे यांच्या वडिलांचे 28 डिसेंबरला निधन झाले.

रात्री उशिरा पन्हाळगड येथील तीन दरवाजा पिछाडीला स्मशानभूमीत मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले. शेडमधील रॅकवर अनोळखी व्यक्‍तीच्या मृतदेहावर अत्यंविधी झाल्याने अस्थी तेथेच पडून होत्या. तिसर्‍या दिवशी अस्थी विसर्जनाचा विधी झाला. दहाव्या, बाराव्या दिवशी कवडे कुटुंबीय अन्य विधीसाठी स्मशानभूमीत आले. तरीही त्याच ठिकाणी रक्षा, अस्थी पडून होत्या. महिन्यानंतरही ‘जैसे थे’ स्थिती... संशय बळावला... तालुक्यात चौकशी केली. मृत व्यक्‍तीची नेमकी माहिती मिळेना... कवडे यांनी पन्हाळा पोलिस ठाणे गाठले.

संशयास्पद रक्षा, अस्थीच्या चौकशीसाठी अर्ज दिला. त्यानुसार अनोळखीच्या आकस्मित मृत्यूची नोंद झाली. आर.आर.पाटील, फडतरेंसह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांना संशय आला. पन्हाळ्यासह वाड्या-वस्त्यांवर दवंडी देण्यात आली; पण कोणीच पुढे येईना...अखेर अस्थींच्या ‘डीएनए’चा निर्णय झाला. पोलिस अधीक्षकांनीही चौकशीचे आदेश दिले. डॉक्टरांना स्मशानभूमीत बोलाविले. पत्रही धाडलं; पण, रात्रीला स्मशानभूमीत येता येणार नाही, असा निरोप आला. त्यामुळे सायंकाळी सहापासून दुसर्‍या दिवशी डॉक्टर येईपर्यंत स्मशानभूमीत बंदोबस्ताचा निर्णय झाला.

कडाक्याची थंडी, काळोख्यात दहा सशस्त्र पोलिसांनी ड्युटी बजावली. रविवारी (दि.13) अखेर पोलिस मंजुनाथ बेळमकर, कृष्णात ठाणेकर, दिलीप भारती आदींनी बेवारस मृतदेहाचा छडा लावला.
मगडवरिया (राजस्थान) येथील छगनलाल (58) काही वर्षांपूर्वी येथे वास्तव्याला आले. धार्मिकवृत्तीचे रावळ यांचे 29 नोव्हेंबरला निधन झाले. त्याच दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवसानंतर पाच अस्थी, रक्षा धार्मिक विधीनंतर नदीत विसर्जित करण्यात आले.

प्रथेप्रमाणे अन्य धार्मिक विधी पार पाडले. त्यामुळे उर्वरित अस्थी अंत्यविधी झालेल्याठिकाणीच विसर्जित करण्यात आल्या. झालं... संशय बळावत गेला... सार्‍यांचीच तारांबळ उडाली... अस्थींचे रहस्य उलगडल्याने पोलिस, ग्रामस्थांनीही सुटकेचा नि: श्‍वास सोडला... पण कडाक्याच्या थंडीत, काळोख्या रात्रीत आणि श्‍वापदांच्या भीतीच्या छायेत बिचार्‍या पोलिसांना अख्खी रात्र स्मशानभूमीत जागून काढावी लागली.

Post a Comment

 
Top