वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली चिंता
धारणी- मेळघाट वन व व्याघ्र प्रकल्पाच्या अरण्यातून वाघांसह अन्य वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, तर त्यांची हत्या करण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. याबाबत वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली असतानाच अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कुसुंबी वर्तुळात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दीड वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झाल्यावर बिबट्या काही अंतरापर्यंत चालत गेला. नंतर त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहणीअंती वर्तवला आहे. दरम्यान, बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बिबट्याच्या मृतदेहाची पाहणी करताना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.

Post a Comment