0
घोटी :

दलालांच्या हातून लग्न लावून घेणे बेलगाव तर्‍हाळे (ता. इगतपुरी) येथील युवकास महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी युवतीच्या साथीने संगनमताने लाखो रुपयांना तरुणास गंडा घातला आहे. तर संशयित युवती लग्‍न केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दागिने घेऊन पळून गेल्याची तक्रार घोटी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तर्‍हाळे येथील लक्ष्मण अशोक मोरे (26) या युवकाची फसवणूक झाली आहे. त्याची शेरसिरंबे (ता. कराड, जि. सातारा) येथील रेखा संजय पाटील, सदा पाटील, वर्षा उर्फ चंदा पाटील यांच्याशी  तोंडी ओळख असल्याने त्यांना लग्नासाठी मुलगी पाहण्याचे सांगितले होते. संशयितांनी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथेे मुलगी असल्याचे सांगत व तिच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लग्नासाठी पैसे द्यावे लागेल, असे सांगून लक्ष्मणला मुलगी पाहण्यासाठी बोलावून घेतले. नवरी मुलगी ज्योती शिवाजी पाटील हिस पाहताच लक्ष्मण याने होकार देत मध्यस्थींच्या हातावर दीड लाख रुपये देवून ‘झट मंगनी पट शादी’ 25 एप्रिल 2018 रोजी उरकली. त्यानंतर लक्ष्मण गावी परतला. गावी परतला पुन्हा नातेवाइकांसमोर धुमधडाक्यात लग्नही केले. त्यात लाख रुपयांचे सोने वधूच्या अंगावर घातले. मात्र, लग्नाच्या दुसर्‍या दिवशी कपडे धुण्याच्या बहाणा करून साडी, कपडे व अंगावरील सोने घेवून साथीदार मनोज देहाडे (रा. इचलकरंजी) याच्यासोबत ओमिनी वाहनातून पळून गेली. यानंतर वधूची शोधाशोध सुरू झाली. मात्र, तिचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. मध्यस्थीनांही फोन केला असता, त्यांनीही युवकास आमचा विषय संपला असल्याचे सांगितले. यामुळे लक्ष्मण यास आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु, आज ना उद्या नवरी परत येईल या आशेने आणि लोक काय म्हणतील या भीतीने त्याची कुठेही वाच्यता केली नाही. अखेर सात महिन्यांनी घोटी पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित संशयितांवर सातारा जिल्ह्यात अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यातील फसवणूक झालेल्यांनी घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी यांनी केले आहे.

सातारा येथून संशयित अटकेत

घटनेचे गांभीर्य पाहता ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक नीलोत्पल, उपाधीक्षक उत्तम कडलग मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. सातारा येथील पोलिसांची मदत घेवून सापळा रचून संशयित आरोपी रेखा पाटील, सदा पाटील यांना पकडण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच सदा पाटील याचे खरे नाव सर्जेराव बाबूराव लोहार असल्याचे सांगण्यात आले. त्याने आम्ही संगनमत करून लक्ष्मण यास फसविल्याचे कबूल केले तर संशयित वधू ज्योती पाटील व साथीदार मनोज देहाडे हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

 
Top