0
मुंबई :

वाढत्या असहिष्णुतेच्या काळात साहित्य अकादमी पुरस्कार सव्याज परत करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण रद्द करण्यात आले. या वादावर महारष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रसिध्दी पत्रक शेअर करुन भूमिका जाहीर केली.

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही. त्‍यांनी जरुर यावं, आम्‍ही त्‍यांचं मनापासून स्‍वागत करतो, असे राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्‍या पसिध्दी पत्रकात म्‍हटले आहे. ‘‘महाराष्‍ट्रातल्‍या मराठी साहित्‍य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं अशी माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. ती योग्‍य देखील आहे. पण नयनतारा सहगल यांच्या सारख्या जेष्‍ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्‍यांच्यासमोर जर मराठी साहित्‍याची समृध्द परंपरा खुली होणार असेल आणि त्‍या जर ही परंपरा जगासामोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारण नाही.

हीच भूमिका स्‍पष्‍ट शब्‍दात पक्षाचे नेते-प्रवक्‍ते अनिल शिदोरे यांनी मांडली होती. पक्षाचा अध्यक्ष या नात्‍याने मी तीच भूमिका पुन्हा एकदा मांडत आहे. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही. त्‍यांनी जरुर यावं, आम्‍ही त्‍यांचं मनापासून स्‍वागत करतो, असे राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्‍या पसिध्दी पत्रकात म्‍हटले आहे. 

‘‘मराठी संस्‍कृतीची जी महत्‍वाची शक्‍तिस्‍थळं आहेत, त्‍यात ‘मराठी साहित्‍य’ हे एक महत्‍वाचं शक्‍तीस्‍थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्‍याचा उत्‍सव साजरा करण्यासाठी, त्‍यावर मंथन करण्यासाठी ‘साहित्‍य संमेलन’ न चुकता भरवण्याची परंपरा महाराष्‍ट्रात असावी. मनसे कार्यकर्त्यांनी यापुढे अशा संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्‍त करताना माझ्याशी चर्चा केल्‍याशिवाय भूमिका मांडू नये. असेही राज यांनी म्‍हटले आहे. 

मराठी साहित्‍य संमेलन आपलं संमेलन आहे. सर्व मराठी जनांचं संमेलन आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो मनस्‍ताप झाला असेल. त्‍याबद्दल मी एक मराठी भाषा प्रेमी या नात्‍याने मनापासून दिलगिरी व्यक्‍त करतो. असे राज यांनी या पत्रकात म्‍हटले आहे.

Post a Comment

 
Top