0
बहुजन आघाडी हा समर्थ पर्याय होऊ शकतो हे कळण्याइतकी राजकीय सुजाणता आंबेडकरांकडे नक्कीच आहे.

नांदेड- एमआयएमचे निवडणूक चिन्ह पतंग आहे. संक्रांतीच्या काळात आकाशात पतंग झेपावताना आणि पेच टाकताना दिसतात. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही संक्रांतीच्या पर्वावर असाच पेच टाकून काँग्रेसचा पतंग कापण्याचा प्रयत्न केला. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ओवेसींच्या या पेचाने आनंदाचा धक्का दिला असला तरी हा पेच वाटतो तितका सोपा नाही.


राज्यात आणि केंद्रात भाजपला सत्तेतून हाकलायचे असेल तर सर्व सेक्युलर विचाराच्या पक्षांची आघाडी झाली पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप-सेना युतीला होणार नाही हा त्यामागचा विचार आहे. या दिशेने काँग्रेसची वाटचाल सुरू असतानाच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. त्यात एमआयएमही सामील झाले. मुस्लिम व दलितांची गठ्ठा मते ही आजवर काँग्रेसची जमेची बाजू राहिली आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होऊनही अशोक चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरूच ठेवली. आंबेडकरांना राष्ट्रवादीची अॅलर्जी आहे आणि काँग्रेसला एमआयएम जातीयवादी पक्ष वाटतो म्हणून चालत नाही. या पेचात आघाडीची बोलणी अडकली होती. खासदार ओवेसी यांनी नांदेडच्या सत्ता संपादन सभेत आमचा अडसर असेल तर आम्ही बाजूला होतो. प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक जागा द्या, असे आव्हान काँग्रेसला केले.

जागावाटपाचा तिढा :
आंबेडकरांना आघाडीत १२ जागा पाहिजेत. औरंगाबाद, अकोला व मुंबईतील एका जागेसाठी त्यांचा विशेष आग्रह आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची बोलणी औरंगाबादच्या जागेसाठीच अडलेली आहेत. अशा स्थितीत औरंगाबादची जागा वंचित आघाडीला देण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी तयार होतील काय, यावर आघाडीचे बरेच काही अवलंबून आहे. बाळासाहेबांनी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. त्यांच्या इच्छेप्रमाणे जर जागा मिळाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता फार कमी आहे. वंचित बहुजन आघाडी हा तिसरा समर्थ पर्याय होऊ शकतो हे कळण्याइतकी राजकीय सुजाणता बाळासाहेबांकडे नक्कीच आहे.

आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास वंचित वर्ग त्यांच्यासोबत राहील का ?
प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीची स्थापना करताना जे वर्ग सत्तेबाहेर आहे, ज्यांना सत्तेच्या जवळ जाता आले नाही अशा धनगर, माळी, कुडमुडे जोशी, लिंगायत, पारधी, आदिवासी, मातंग, नाभिक अशा वंचित जातींना सत्तेवर बसवण्यासाठी ही आघाडी असल्याचे सांगितले. बाळासाहेबांच्या विधानाने ओबीसी वर्ग त्यांच्याकडे गेला. धनगर समाज, लिंगायत समाज त्यांच्याकडे गेला. काँग्रेस आणि भाजपच्या राज्यात न्याय मिळाला नाही म्हणून हा वर्ग नाराज होता आणि त्यामुळेच त्यांनी वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय निवडला. परंतु उद्या जर आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तर हे वर्ग त्यांच्यासोबत राहतील काय, हा खरा प्रश्न आहे.
Politics of Owaisi against Congress and Prakash Ambedkar 

Post a Comment

 
Top