0
नवी दिल्ली :

येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागले आहे. या वातावरणातच तीन राज्यात सत्ता गमावलेल्या भाजपला केंद्रीय सांखिकी विभागाने थोडा दिलासा दिला आहे. केंद्रीय सांखिकी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०१८-१९ मध्ये भारताचा विकास दर हा ७.२ % इतका राहील. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा विकास दर हा ०.५ % वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा दर ६.७ इतका होता.

निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारसाठी दिलासा देणारी आर्थिक आकडेवारी जाहीर झाली आहे.  आर्थिक व्यवहार सचिव एस.जी. गर्ग यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर हा चांगला राहणार असल्याने जागतिक पातळीवर भारताचा सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा टॅग आबाधीत राहणार आहे असे सांगिलते. केंद्रीय सांखिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार उत्पादन, कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. या तीनही महत्वाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

कृषी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.४% वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कृषी विकास दर ३.४% होता तो या वर्षी ३.८% राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन क्षेत्रात या आर्थिक वर्षात मोठी वृध्दी होण्याची शक्यता आहे. २०१८-१९ मध्ये उत्पादन क्षेत्र ८.३% ने वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा दर ५.७ % इतका होता. उत्पादन क्षेत्राबरोबर बांधकाम क्षेत्रातही मोठी वाढ संभवते. गेल्या आर्थिक वर्षात ५.७ % वर असणारा विकास दर हा यंद्दाच्या वर्षी ८.९ % जाईल असा अंदाज आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ आर्थिक वर्षाचा विकास दर ७.४ % राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. केंद्रीय सांखिकी विभागाने वर्तवलेला अंदाज आरबीआयपेक्षा ०.२ % कमी आहे. त्यांनी ७.२% विकास दर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

Post a Comment

 
Top