0
मुंबई :

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आठवडा उलटूनही कोणताच तोडगा न निघाल्याने मुंबईकरांचे रस्त्यावरील हाल कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करूनही संप जैसे थे आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभर चाललेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून न्यायालयात भूमिका स्पष्ट केली जाईल.

मनपा, बेस्ट आणि कामगार संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होऊनही संपावर कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारकडून नेमण्यात आलेल्या  उच्चस्तरीय समितीची मात्राही संपावर तोडगा काढू शकलेली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. राज यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना एकजूट राहण्याचा सल्ला दिला होता.  संपामुळे मुंबईची बससेवा ठप्प झाली आहे. संपामुळे जवळपास ३० लाखांवर प्रवासी वेठीला धरले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून चालक, वाहकांनी आगाराकडे फिरकलेले नाहीत.

संपाचे राजकारण करू नका : उद्धव ठाकरे 

बेस्ट कामगारांचा प्रश्‍न महत्त्वाचा असून त्यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. जी वेतनश्रेणी ठरली ती मान्यताप्राप्त युनियनसोबत झालेल्या करारानुसारच आहे. त्यानुसारच पगार होत असून बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असली तरी त्यांच्या तोंडाला पाने पुसणार नाही, असे सांगतानाच  बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सुधारणा कराव्या लागल्या तरी एकाही कर्मचार्‍याची नोकरी जाणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली.

मागील सहा दिवसांपासून बेस्टचा संप सुरू असून या संपाबाबत भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बेस्टमधील मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे. या बेस्ट कर्मचार्‍यांशी आणि मुंबईकरांशी आम्ही बांधील आहोत. त्यांच्या जे काही हिताचे आहे ते मी करायला तयार आहे. उगाचच अवाजवी मागण्या करू नका. बेमुदत संप केला तर एकदिवस पगार देणेही कठीण होऊन जाईल. त्यामुळे संपावर एकत्र येऊन तोडगा काढू, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

 
Top