0
शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही.

साधकाचे ‘मन’ पवित्र असते. पवित्र मन मनाला सात्त्विक समाधान देते. नवरात्रीच्या नऊ माळा म्हणजे मनाच्या नऊ पायऱ्या १) मन:शांती २) मन-भक्ती ३) मन:शक्ती ४) मनकृती ५) मनवृत्ती ६) मन जागृती ७) मन-प्रकृती ८) मनदेवी ९) मनस्मृती या मनाच्या अवस्था साधकाजवळ असतात. मनाच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे अवलोकन महत्त्वाचं असते. मनाच्या वृत्तीचा परिणाम मनाच्या शक्तीवर होता. मन:शक्तीचा परिणाम त्याच्या कृतीवर- कृतीचा परिणाम वृत्तीवर- वृत्तीचा परिणाम प्रकृतीवर- प्रकृतीचा परिणाम मनजागृतीवर- मन स्मृतीचा परिणाम मनदेवीवर- अशी शृंखला मनाच्या कप्प्यात असते. त्यानुसार साधकाच्या मनाची अवस्था परिपक्व होेते. साधकाच्या मनात अनेक विचारांना थारा नसतो. ते मन आपल्या इष्ट देवतेच्या शोधात असते. त्याच्या मनाची एकवृत्ती असते. अशा मनाला एकत्वाची जाणीव होते. ते मन एकाग्रतेत असते. एकाग्र मन शांतीला जन्म देते. शांती चित्ताला समाधान देते. समाधानी चित्त प्रसन्नतेची वलयं निर्माण करतात. प्रसन्न तेथे वलयातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. म्हणून साधकाजवळ सकारात्मक ऊर्जावलयं असतात. साधकाच्या सान्निध्यात राहिल्यास चित्तास समाधान मिळते. वाईट वासनांचा त्याग होतो. त्याचे भ्रमित मन शांतीत परावर्तित होते.

शांत मनात कुठलीही विकृती नसते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही. हे मानवी जीवनाचे मूळसूत्र आहे. तेच सूत्र साधक साधत असतात. म्हणून तर संतांनी म्हटले आहे, ‘शांतिपर ते नाही सुख । येर अवघेची दु:ख ।। शांती ज्या मनात असते ते मन प्रभावशाली असते. त्या मनाची शक्ती अनंतपटीने ऊर्जा निर्माण करते. ज्या ठिकाणी शांती असते तेथे काळाची गती खुंटत असते. म्हणून साधकाच्या जीवनात शांतीला खूप महत्त्व आहे. शांतीच्या सहवासात साधक न्हाऊन निघतो. त्याच्या मनाची विश्रांती शांतीच असते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मन सर्वांवर मात करून आपले ध्येय गाठत असते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
MINDING THE SPIRIT AND THE SPIRITUAL MIND | शांत मन ध्येय गाठते

Post a Comment

 
Top