0
नाशिक : 
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या निरनिराळ्या भागांत बिबटे दिसल्याने दहशत पसरलेली असताना, शुक्रवारी (दि. 25) सकाळी गंगापूर रोडच्या शंकरनगर परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात नगरसेवक व दोन पत्रकार जखमी झाले. अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शहरात मखमलाबाद, पळसेसह अन्यत्र बिबट्याचे दर्शन घडल्याने शहरवासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. त्यातच शुक्रवारी सकाळी सकाळी साडेआठच्या सुमारास गंगापूर रोड भागातील शंकरनगर परिसरात नागरिकांना बिबट्या दिसला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिस आणि वन विभागाला कळविण्यात आले. काही वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामनही घटनास्थळी पोहोचले. मात्र, नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी केल्याने बिबट्या बिथरला. त्याच्या हल्ल्यात शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड, पत्रकार कपिल भास्कर व तबरेज शेख जखमी झाले. अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, या घटनेमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

 
Top