0
भाजप युतीसाठी आग्रही प्रादेशिक पक्षांना महत्त्व असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केले मान्य

मुंबई- शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका होत असताना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना चौकीदार चोर असल्याचे म्हटले. मात्र, असे असतानाही भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय केला असून जागावाटपात शिवसेनेला योग्य ते स्थान दिले जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानेच नगरमध्ये आम्ही भाजपचा पाठिंबा न घेता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात होतो, असे रामदास कदम यांनी नुकतेच सांगितले. याेग्य वेळी उद्धव ठाकरे युतीबाबत उत्तर देतील, असेही शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सूर्यावर थुंकल्यास काय होते, असा प्रश्न करत आणि योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा शिवसेनेला दिला. यावरून भाजप-शिवसेना युतीचे काय होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. शिवसेना भाजपबरोबर युती करण्यास तयार नसून भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील, असे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजप शिवसेनेशी लोकसभेसाठी युती होईल, अशी आशा बाळगून आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेनेला ठरावीक जागा देणार, अशा बातम्या येत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उत्तर देतील : हर्षल प्रधान
भाजपच्या या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी सांगितले, युतीबाबतचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारीत आहे. युती करायची की नाही, कशी करायची याबाबत हे दोघेच निर्णय घेणार आहेत आणि प्रादेशिक पक्षांच्या नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत आणि युतीबाबत उद्धव ठाकरे स्वतःच योग्य वेळी बोलतीलच आणि उत्तरही देतील, असेही हर्षल प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, आता दोन्ही पक्ष गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. त्यामुळे दाेन्ही पक्षांत युती होते की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तडजोडीवरच दोन्ही पक्षांच्या युतीचे भवितव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनडीएत असलेल्या प्रादेशिक पक्षांना खूप महत्त्व असून त्यांना आम्ही सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहोत, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी पक्षाने निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला विचारला असता त्यांनी सांगितले, शिवसेनेसोबत युती करण्याचा आमचा निर्णय आहे. एकमेकांवर टीका होत असली तरी निवडणुकीसाठी आम्ही दोघांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मात्र, जागावाटपात काय तडजोडी होतात यावर सगळे अवलंबून आहे. आम्ही शिवसेनेला युतीचा प्रस्ताव देणार असून त्यांना योग्य जागावाटपाचा प्रस्ताव देऊ, असेही या नेत्याने सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस जनतेकडून सूचना मागवून तयार करणार जाहीरनामा
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे असून अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा थेट जनतेच्या सूचनांच्या आधारे तयार करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी एक ईमेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांक पक्षातर्फे जारी करण्यात आला असून त्याद्वारे जनतेने आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. यापूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीने जनतेकडून प्रश्न मागवले होते. त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता जाहीरनामाही जनतेच्या सूचनेच्या आधारे तयार करण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने पक्का केला असून त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांदरम्यान जागावाटपाची चर्चाही सुरू झाली आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीने आता जाहीरनाम्याच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. त्यासाठी आपली राष्ट्रवादी, आपला जाहीरनामा' असा एक अनोखा उपक्रम राष्ट्रवादीने राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत जनतेला जाहीरनाम्यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ncpideas@gmail.com हा ईमेल आयडी तयार करण्यात आला असून ९६८९३१८३६५ हा व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दुष्काळ, महागाई, इंधनाचे वाढते दर, महिला सुरक्षा आणि आरक्षण यासारख्या विषयावर जनतेकडून प्रश्न मागवले होते. त्याला प्रतिसाद मिळाला होता.
News about BJP and ShivSena

Post a Comment

 
Top